शाहूंच्या पुरोगामी विचारांनेच कोल्हापूरसह देशाची प्रगती, शाहू छत्रपती यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:37 PM2022-04-19T12:37:47+5:302022-04-19T12:38:17+5:30
पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी हा लढा शाहू महाराजांच्या काळापासून चालत आला आहे. चांगले ध्येय घेऊन काम सुरू केले की विरोध हा होतोच.
कोल्हापूर : पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी हा लढा शाहू महाराजांच्या काळापासून चालत आला आहे. चांगले ध्येय घेऊन काम सुरू केले की विरोध हा होतोच. शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन नवीन पिढीने शिक्षणाकडे लक्ष द्यावे, कुस्ती, कला-क्रीडा क्षेत्रात पुढे यावे. पुरोगामीत्वाच्या दिशेने चालत राहिलो तर कोल्हापूरच नव्हे तर देशाची प्रगती होईल, असा विश्वास शाहू छत्रपती यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. शाहू महाराजांच्या या कृतज्ञता पर्वाचा डंका नागपूरपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त आयोजित राजर्षी शाहू छत्रपती कृतज्ञता पर्वाला दिमाखात प्रारंभ झाला. भवानी मंडपात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. याअंतर्गत छत्रपती शाहू मिलसह जिल्ह्यात ठिकठिकाणी २२ मेपर्यंत शाहूंच्या विचारांचा जागर होणार आहे. केवळ ४९ वर्षांचे आयुष्य आणि २८ वर्षे कारकीर्द लाभलेल्या शाहू महाराजांनी आपल्या काळात कोल्हापूरच्या सर्वांगीण प्रगती व परिवर्तनासाठी डोंगराएवढे काम उभे केले.
त्यांच्या या कार्याचा वसा पुढच्या पिढीला देत महाराजांना जगभर पोहोचविण्याच्या उद्देशाने या कृतज्ञता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे, आमदार जयश्री जाधव, जयंत आसगावकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रकुलगुरू पी. एस. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.
शाहू महाराज म्हणाले, शाहू मिलमधील स्मारकाचे काम तातडीने सुरू व्हावे, यासाठी सर्वांनी त्याकडे लक्ष द्यावे. या वर्षांत त्यांच्या कार्याचे स्मारक म्हणून याकडे आपण पाहिले पाहिजे. महाराष्ट्र शासन शाहूंचे विचार जागरण्याचे काम करत आहे. केंद्र शासनानेही काही प्रमाणात हे काम केले आहे. परंतु, त्यांना शाहू महाराज कळणे हेच मुळी कठीण आहे.
या सोहळ्यात शाहू छत्रपती यांनी खासदार संभाजीराजे यांचा चिमटा काढला. ते म्हणाले, आपण शाहूंचे कार्य देशात पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहात. त्यांच्या कार्याची महती अभ्यासपूर्ण मांडता आहात ही खूप चांगली गोष्ट आहे. पण हे जरा लवकर कळलं असतं तर बरं झालं असतं. उशिरा का होईना केंद्रातील नेत्यांना शाहू समजायला लागतील ही चांगली गोष्ट आहे. शाहू महाराजांच्या या कृतज्ञता पर्वाचा डंका पार नागपूरपर्यंत पोहोचला पाहिजे.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, शाहू महाराजांनी सर्वच क्षेत्रात उमटवलेल्या कार्यकर्तुत्वाचे प्रतिबिंब अनेक राज्यांत उमटले. शाहूंचा इतिहास लाभलेल्या कोल्हापुरात दैदिप्यमान भूगोल निर्माण करण्याची ताकद आहे. त्याची सुुरूवात शाहू कृतज्ञता पर्वाने करूया. याअंतर्गत दागिन्यांची जत्रा, कला-सांस्कृतिक उपक्रम, कृषी प्रदर्शन, शाहिरी, चप्पल महोत्सव, तालुकावार कुस्ती स्पर्धा, राधानगरी ट्रेक, मातीच्या कलाकृती असे अनेक उपक्रम घेतले जाणार आहेत.
खासदार संभाजीराजे म्हणाले, शाहू महाराज हे राजवाड्यात राहणारे, संवेदनशील लोकनेते होते. शोषित, अन्याय सहन करणाऱ्या जनतेची अवस्था बघून त्यांनी बहुजनांचे लढे उभारले. जे ज्या-ज्या ठिकाणी गेले तिथे शाहू कृतज्ञता पर्व झाले पाहिजे. शाहू महाराजांनी उभारलेल्या वास्तूंची दुरवस्था झाली आहे. त्या वास्तूंचा जीर्णोद्धार होणे ही त्यांना वाहिलेली खरी कृतज्ञता असेल.
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शाहू महाराजांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रास्ताविकात महापुरुषांचे काम आणि वारसा सुरू राहणे हे त्यांच्या अनुयायांवर अवलंबून असते. आपण सगळे कोल्हापूरचा विकास करून शाहू महाराजांना आदरांजली वाहूया, असे सांगून शाहू कृतज्ञता पर्वाच्या आयोजनामागील उद्देश सांगितला. या विचार पर्वात कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. प्राचार्य महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले.
१०० व्याख्याने आणि १०० सेकंद
मंत्री पाटील म्हणाले, या पर्वांतर्गत ५ मे रोजी जिल्ह्यात एकाचवेळी १०० व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. ६ मे रोजी शाहू मिल ते शाहू समाधीस्थळापर्यंत समता फेरी काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता जिल्ह्यात १०० सेकंद स्तब्ध राहून शाहू महाराजांना आदरांजली वाहिली जाईल. यादिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्री येण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.