कोल्हापुरात अद्ययावत शूटिंग रेंज होणार, इलेक्ट्रॉनिक, इंडियन टारगेटसह १५ प्रकारचे साहित्य घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 03:09 PM2024-11-28T15:09:14+5:302024-11-28T15:11:33+5:30

कोल्हापूर : ऑलम्पिकवीर स्वप्निल कुसाळे याने देशाला रौप्यपदक मिळवून दिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील अनेक नेमबाजपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी ...

The shooting range at Chhatrapati Sambhaji Maharaj Divisional Sports Complex in Kolhapur will be updated | कोल्हापुरात अद्ययावत शूटिंग रेंज होणार, इलेक्ट्रॉनिक, इंडियन टारगेटसह १५ प्रकारचे साहित्य घेणार

कोल्हापुरात अद्ययावत शूटिंग रेंज होणार, इलेक्ट्रॉनिक, इंडियन टारगेटसह १५ प्रकारचे साहित्य घेणार

कोल्हापूर : ऑलम्पिकवीर स्वप्निल कुसाळे याने देशाला रौप्यपदक मिळवून दिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील अनेक नेमबाजपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंज अद्ययावत करण्यात येणार आहे. १०, २५ आणि ५० मीटर रेंजमध्ये मेटॉन इलेक्ट्रॉनिक्स आणि भारतीय बनावटीच्या टारगेट बसविण्यात येत आहेत. त्यासह १५ प्रकारच्या साहित्याची मागणी विभागीय क्रीडा संकुल कार्यालयाने केली आहे.

क्रीडा व युवक सेवा, संचालनालयाने पुणे विभागाने कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलात शूटिंग साहित्याचा पुरवठा करण्यासाठी ई निविदा मागविली आहेत. १०, २५ आणि ५० मीटरच्या रेंजच्या साहित्यासह ॲण्टी स्किड प्लोरिंग मॅट, इलेक्ट्रॉनिक टारगेट बँकअपसाठी यूपीएस सिस्टीम, कॉम्प्रेसर मशीनसह लागणारे अन्य साहित्य खरेदी केले जाणार आहे. ऑलम्पिकवीर स्वप्निल कुसाळे याने देशाला रौप्यपदक मिळवून दिले. त्या धर्तीवर अनेक ऑलम्पिकवीर घडावेत, यासाठी शूटिंग रेंज अद्ययावत करण्यात येत आहे. खेळाडूंना सरावासाठी ही रेंज उपयोगी ठरणार आहे.

अशी होईल प्रक्रिया

ही निविदा ११ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अपलोड केली जाणार आहे. १२ डिसेंबरला साडेअकरा वाजता छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात साडेअकरा वाजता शूटिंग रेंज खोली क्रमांक येथे उघडली जाणार आहे. तसेच पूर्व बोलीही २ डिसेंबरला दुपारी एक वाजता होणार आहे.

महिन्याला २ हजार शुल्क

सध्या शूटिंग रेंजच्या खेळाडूंकडून महिन्याला दोन हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते. आठवड्यातून दोन ते तीन दिवस सराव केला जातो; तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून मार्गदर्शन केले जाते. अद्ययावत रेंजमध्ये टार्गेटची संख्या वाढल्यास जादा खेळाडूंना सरावासाठी संधी मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतील खेळाडूही या ठिकाणी सराव करतात.

शिबिरात ग्वाही

माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विभागीय क्रीडासंकुलात २६ सप्टेंबर, २०२४ रोजी झालेल्या शिबिरात शूटिंग रेंज अद्ययावत करण्यासाठी निधी देण्याची घोषणा केली होती. ऑलिम्पिकवीर स्वप्निल कुसाळे, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत यांच्यासह विशेष प्रावीण्य मिळविलेले नेमबाजपटू तयार होण्यासाठी ही रेंज अद्ययावत करण्यात येत आहे.

सन २०२२-२३ मध्ये बसविलेले टारगेट
१० मीटर रेंज - १५
२५ मीटर रेंज - ५
५० मीटर रेंज- ८

सन २०२४-२५ मध्ये खरेदी करण्यात येणारे टारगेट
रेंज /मेटॉन इलेक्ट्रॉनिक/ भारतीय बनावटीचे

१० मीटर रेंज/१०/३
२५ मीटर रेंज/३/ ५
५० मीटर रेंज/३/ ३

डिसेंबरमध्ये साहित्य

जिल्ह्यातून अनेक खेळाडू घडविण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहितेपूर्वी झालेल्या बैठकीत ही रेंज अद्ययावत करण्याचे ठरले होते. त्यानुसार ई-निविदा प्रसिद्ध केली आहे. डिसेंबर महिन्यातच साहित्याचा पुरवठा होईल, अशी शक्यता आहे.

परवानाधारक, नोंदणीकृत, मान्यताप्राप्त, अनुभवी उत्पादक, वितरक यांच्याकडून दोन लिफाफा आणि खुल्या स्पर्धात्मक पद्धतीने ऑनलाइन ई-निविदा मागविल्या आहेत. इच्छुक निविदाधारकांनी http://mahatender.gov.in ही वेबसाईटवर संपर्क करावा. -माणिक पाटील, क्रीडा उपसंचालक

Web Title: The shooting range at Chhatrapati Sambhaji Maharaj Divisional Sports Complex in Kolhapur will be updated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.