कोल्हापुरातील बिंदू चौकात भरधाव कारचा थरार, सात दुचाकींना ठोकरले; दाम्पत्यासह तिघे जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 11:34 AM2023-03-04T11:34:16+5:302023-03-04T11:34:40+5:30

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी

The thrill of a speeding car at Bindu Chowk in Kolhapur, Three injured including a couple | कोल्हापुरातील बिंदू चौकात भरधाव कारचा थरार, सात दुचाकींना ठोकरले; दाम्पत्यासह तिघे जखमी 

कोल्हापुरातील बिंदू चौकात भरधाव कारचा थरार, सात दुचाकींना ठोकरले; दाम्पत्यासह तिघे जखमी 

googlenewsNext

कोल्हापूर : शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भवानी मंडप ते बिंदू चौक मार्गावर सबजेलजवळ चालकाचा ताबा सुटल्याने कारने शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास दाम्पत्यासह सात दुचाकींना ठोकरले. या अपघातात महिलेसह तिघे जण जखमी झाले. 

राजेश श्रीपती तोरस्कर (वय ४८), राणी राजेश तोरस्कर (४२, रा. रविवारपेठ, कोल्हापूर) यांच्यासह एक मुलगाही यामध्ये जखमी झाला. जखमीमध्ये राजेश तोरस्कर यांना गंभीर इजा झाली आहे. कारने उडवल्याने दुचाकींचे मोठे नुकसान झाले. या घटनेत काही दुकानांसह स्टॉलचीही मोडतोड झाली. जखमी मुलाचे नाव समजू शकले नाही.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे येथील काही भाविक कारने आदमापूर येथील बाळूमामाचे दर्शन घेऊन अंबाबाई दर्शनासाठी कोल्हापुरात आले होते. देवीचे दर्शन झाल्यावर कार भवानी मंडपातून बिंदू चौकाकडे जात होती. सबजेलपासून काही अंतरावर चालकाचा कारवरील ताबा सुटला. भरधाव असलेल्या कारने चालत जात असलेल्या तोरस्कर दाम्पत्याला जोरात धडक दिली. त्यात राणी तोरस्कर रस्त्याच्या बाजूला फेकल्या. पती राजेश गाडीखाली पडले. यावेळी लहान मुलालाही इजा झाली.

कारने रस्त्याच्या बाजूला असलेल्या कापड, चप्पल विक्री दुकान, स्टॉलधारक, दुचाकी वाहनांना उडविले. अचानक झालेल्या अपघातामुळे परिसरातील व्यापारी, स्टॉलधारकांसह भाविकांची धांदल उडाली. अनेक जणांनी भीतीने पळापळ केली. मोटारीखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या राजेश तोरस्कर यांना सीपीआरमध्ये तत्काळ दाखल करण्यात आले. कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मोटार चालक सतीश नायडू (वय ७५, रा. पुणे) यांना जुना राजवाडा पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले.

बघ्याची गर्दी

मध्यवर्ती व गजबजलेल्या रस्त्यावर दुर्घटना घडल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी वाहने इतरत्र पडल्याने रात्रीपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली. सहायक निरीक्षक संदीप जाधव यांच्यासह जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी व शहर वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Web Title: The thrill of a speeding car at Bindu Chowk in Kolhapur, Three injured including a couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.