'वर्क ऑर्डर' दिलेल्या कामाचा पत्ता लागेना, कोल्हापूर महापालिकेचा सावळागोंधळ

By भीमगोंड देसाई | Published: December 6, 2023 02:07 PM2023-12-06T14:07:36+5:302023-12-06T14:08:15+5:30

प्रशासकांनी सूचना दिल्या तरी कोणत्या ठेकेदारांना नोटीस देणार?

The work given work order is not started, A total of 242 crore development works were approved in Kolhapur city | 'वर्क ऑर्डर' दिलेल्या कामाचा पत्ता लागेना, कोल्हापूर महापालिकेचा सावळागोंधळ

'वर्क ऑर्डर' दिलेल्या कामाचा पत्ता लागेना, कोल्हापूर महापालिकेचा सावळागोंधळ

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : शासनाच्या विविध योजनांतून एप्रिल २०२३ पासून शहरात एकूण २४२ कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. मात्र यातील कोणती कामे कोणत्या टप्प्यात आहेत, वर्क ऑर्डर देऊनही किती कामे सुरू झालेली नाहीत, याचा पत्ताच महापालिका नगरविकास प्रशासनास अजून लागलेला नाही. असा गलथान कारभार असेल तर प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिलेल्या सूचनेनुसार कामे सुरू न केलेल्या कोणत्या ठेकेदारांना नोटीस देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा कारभारामुळेच शहरातील विकास कामांचा बोजवारा उडत असल्याच्या तक्रारी आहेत.

सुवर्ण जयंती, नगरोत्थान, लोकशाही आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, पर्यटन विकास, अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात विकास अशा विविध योजनांतून विकास कामे मंजूर आहेत. यातून शहरातील रस्ते, गटर्स, पॅसेज काँक्रीट, सभागृह, ओपन जीम, क्रीडांगण विकास अशी २४२ कोटींची कामे मंजूर आहेत. यांना वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात किती कामे सुरू झालेली आहेत, सुरू झालेली कामे कोणत्या टप्प्यात आहेत, वर्क ऑर्डर देऊनही किती कामांना सुरुवात झालेली नाही, याची नेमकी माहिती महापालिकेतील नगरविकास विभागाकडे नाही. परिणामी या कामांवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील रस्त्यांची कामे अजूनही सुरू झालेली नाहीत. कामे मंजूर आहेत, मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने वाहनधारकांना खड्डे पडलेल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. मंजूर कामांचा ठेका घेतलेल्या ठेकेदारास काम सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र तो आदेश गुंडाळून ठेवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही, असे दोन दिवसांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत प्रशासक मंजुलक्ष्मी यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना नोटीस काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. नोटीस देण्यास किती ठेकेदार पात्र आहेत, याची एकत्रित माहिती महापालिका नगरविकास विभागाकडे नसल्याचे समोर आले आहे.

२० ते २५ ठेकेदार

कामांची निविदा ऑनलाईन प्रसिद्ध केली जाते. मात्र महापालिकेची कामे करणारे माजी नगरसेवकांच्या जवळचे ठरावीकच ठेकेदार आहेत. त्यांच्याकडे ऑनलाईन निविदा मॅनेज करून आपल्यालाच ठेका मिळवण्याचे कौशल्य आहे. यामुळे त्यांनीच मंजूर २४२ कोटींचीही कामे घेतली आहेत. प्रशासकांनी त्यांना नोटीस काढायचे आदेश दिले तरी अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण साटेलोटे असल्याने ते धाडस करीत नाहीत, अशाही तक्रारी आहेत.

नेत्याचा एक पीए आणि काही माजी नगरसेवक

सत्तेतील एका नेत्याचा पीए आणि ठेकेदाराशी मधुर संबंध असलेले तीन ते चार माजी नगरसेवक महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना वारंवार चिकटून बसत आहेत. ते अधिकाऱ्यांसमोर असले तर शिपाई अभ्यागतांना कक्षात प्रवेश देत नाहीत. यामुळे बाहेर अभ्यागतांना तासन्तास ताटकळत राहावे लागत आहे.

Web Title: The work given work order is not started, A total of 242 crore development works were approved in Kolhapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.