कोल्हापूर : कावळा नाका परिसरात चोरीचे खोबरेल तेलाचे डबे विक्रीसाठी घेऊन फिरणाऱ्या राजेंद्रनगर झोपडपट्टी येथील तिघा सराईत महिला गुन्हेगारांना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. संशयित तायडी मोतीराम रणदिवे (वय २४), सीमा सुरेश पांडागळे (२८), राजश्री दत्ता नाईक (२८) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरीचे ४५ हजार किमतीचे १५ आॅईलचे डबे जप्त केले.
लोणार वसाहत येथील एका आॅईल मिलचे शटर उचकटून चोरट्यांनी ६७ हजार ५०० रुपयांचे खोबरेल तेलाचे डबे व बिड धातूच्या प्लेट्स चोरून नेल्याचे चार दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. या प्रकरणी सुहास सुरेश बनछोडे (रा. बाजारगेट, महापालिका परिसर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
चोरट्यांचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना रविवारी रात्री कावळा नाका परिसरात तीन महिला खोबरेल तेलाचे डबे विक्रीसाठी घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकाचे संतोष पवार यांना कारवाईच्या सूचना दिल्या.
पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी कावळा नाका परिसरात टेहाळणी केली असता राजेंद्रनगर येथील तीन सराईत चोरट्या महिला मिळाल्या. चौकशीमध्ये त्यांनी चोरीची कबुली देत सीमा पांडागळे हिच्या घरात तेलाचे डबे ठेवल्याची माहिती दिली. तिच्या घरातून तेलाचे पंधरा डबे जप्त केले.
‘मॉडेल स्टाईल’मध्ये फोटोराजेंद्रनगर झोपडपट्टी परिसरातील या महिला चोरट्यांवर पोलीस अधीक्षकांनी यापूर्वी हद्दपारीची कारवाई केली आहे. एक नव्हे तर तब्बल पंचवीसपेक्षा जास्त घरफोडी,चोरीचे गुन्हे या महिलांवर आहेत. पोलिसांनी अटक केली तरीही संशयित तायडी रणदिवे, सीमा पांडागळे, राजश्री नाईक यांचा पोलीस ठाण्यात रूबाब असतो. पोलिसांबद्दलची भीतीच त्यांना नाही.
रविवारी तर एका महिला गुन्हेगाराने ‘मॉडेल स्टाईल’मध्ये पोलिसांना फोटो दिला. तपास अधिकारी आणि त्यांचे सहकारी ही स्टाईल निमूटपणे पाहत होते. तो फोटोही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. यावरून पोलिसांनी गुन्हेगारांशी असलेली सलगी स्पष्ट दिसते.