विधानसभेसाठी कोल्हापूर 'उत्तर'मधून मालोजीराजे रिंगणात उतरण्याची हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 01:37 PM2023-07-04T13:37:18+5:302023-07-04T13:38:56+5:30
मालोजीराजे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाच तर ते कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात
कोल्हापूर : माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस त्यांच्या समर्थकांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण शहरभर त्यांचे डिजिटल फलक झळकल्याने ‘कोल्हापूर उत्तर’मधून विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा असल्याने मालोजीराजे त्यास उपस्थित राहण्यासाठी सहकुटुंब बंगळुरूला गेले आहेत. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यास ते उपस्थित राहिले नाहीत.
मालोजीराजे छत्रपती गेल्या काही महिन्यापासून सामाजिक कार्यात सहभागी झाले आहे. शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या शाहू गोल्ड कप फुटबाॅल स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी क्रीडाप्रेमींशी जवळीक साधली. न्यू पॅलेसवरील त्यांच्या कार्यालयात कार्यकर्ते, नागरिकांना भेटत आहेत. जातीय दंगलीनंतर झालेल्या सदभावना यात्रेतही ते त्यांच्या समर्थकांसह सहभागी झाले होते. सोमवारी साजरा झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरभर डिजिटल फलकांवर मालोजीराजे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शहरातील अनेक माजी नगरसेवक, विविध सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, फुटबॉल खेळाडू यांच्या वतीने सोमवारी सामाजिक उपक्रम राबविले. तसेच गेल्या काही महिन्यापासून मालोजीराजे यांचे कार्यकर्तेही सक्रिय झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मालोजीराजे विधानसभेची निवडणूक ‘कोल्हापूर उत्तर’मधून लढविण्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
मालोजीराजे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाच तर ते कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे. कोल्हापूर उत्तरचे प्रतिनिधित्व सध्या जयश्री जाधव या करत आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ‘कोल्हापूर उत्तर’ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार हेही अद्याप स्पष्ट झाले नाही. बदलत्या राजकीय परिस्थितीत मालोजीराजे तगडे, ताकदवान उमेदवार आहेत. त्यामुळे ज्या पक्षाला कोल्हापूर उत्तर ही जागा जाईल त्या पक्षाचे उमेदवार असू शकतात, अशीही एक शक्यता व्यक्त केली जाते.