कोल्हापूर : सीएए आणि एनआरसीबाबत आमची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करत असल्याने तेच पुढील निर्णय घेतील, असे सांगून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ठाकरे यांच्या वक्तव्यावर आम्ही भाष्य करणे योग्य नाही अशी पुस्ती जोडली. सीएए आणि भीमा कोरेगाव तपासावरुन महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल आहे, कोणत्याही प्रकारची धुसफूस नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला.कोल्हापुरात भरलेल्या आंतरराष्ट्रीय ब्राम्हण परिषदेच्या उद्घाटन समारंभानंतर पत्रकारांशी औपचारीक गप्पा मारताना मंत्री पाटील यांनी वरील वक्तव्य केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सीएएचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील यांनी राज्याचे आणि महाविकास आघाडीचे प्रमुख या नात्याने तेच निर्णय घेणार आहेत.
भीमा-कोरेगावप्रकरणी राज्य सरकारकडून समांतर तपास सुरु असल्याबद्दल विचारले असता पाटील यांनी समांतर चौकशीचा निर्णय अजून कागदोपत्री झालेला नाही. झाला असेल तर त्याची मला कांही कल्पना नाही, असे सांगत यापासून अनभिज्ञ असल्याचे सांगितले.