कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या न्यू शाहूपुरी येथील एटीएम सेंटरमध्ये चोरट्यांनी मशीन फोडून दोन लाख आठ हजार रुपयांची रोकड लंपास केली. हा प्रकार रविवारी (दि. २८) सकाळी सव्वासहा ते पावणेसातच्या दरम्यान घडला. याबाबत बँकेतील अधिकारी नितीन मोहन सुभेदार (वय ५४, रा. पाचगाव) यांनी मंगळवारी (दि. ३०) शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी सव्वासहा ते पावणेसातच्या दरम्यान तीन ते चार चोरट्यांनी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. मशीनच्या स्क्रीनजवळ छेडछाड करून त्यांनी आतील दोन लाख आठ हजारांची रोकड काढली. मशीनचे स्क्रीन पुन्हा पूर्ववत जोडल्याने बँकेच्या कर्मचाऱ्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला नाही. मात्र, बँकेच्या पुणे येथील एका एटीएम सेंटरमध्ये अशाच प्रकारे स्क्रीन काढून चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने न्यू शाहूपुरी येथील शाखेतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील एटीएम मशीनची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांना छेडछाड आणि चोरीचा प्रकार लक्षात आला. वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून अधिकाऱ्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मशीनची तांत्रिक माहिती असलेल्या सराईत टोळीचे हे कृत्य असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
कोल्हापुरातील महाराष्ट्र राज्य बँकेच्या एटीएममधून दोन लाख काढून पूर्ववत केले मशीन, चोरटे 'सीसीटीव्ही'त कैद
By उद्धव गोडसे | Published: April 30, 2024 7:22 PM