गडहिंग्लज (जि.कोल्हापूर) : हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांनी किती गोळा केले? त्याची चौकशी करण्यासाठी ही 'करेक्ट केस' आहे. परंतु,आमची परिस्थिती नाही. त्यामुळे आमचे मतदार पायी चालत, सायकलीने, बैलगाडीने येतील आणि राजर्षि शाहू महाराजांचा समतेचा विचार दिल्लीला पोहोचविण्यासाठी शाहू छत्रपतींनाच मतदान करतील,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
दोन दिवसांपूर्वी कागलमध्ये संजय मंडलिक यांच्या प्रचाराची सभा पार पडली. यावेळी हेलिकॉप्टरने माणसं आणू, पण संजय मंडलिक यांना विजयी करू. आता देव आला तरी मंडलिक यांचा पराभव होणार नाही, असे विधान राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले होते. यावरून जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या हसन मुश्रीफ यांना टोला लगावला आहे. कानडेवाडी येथे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते.
या मेळाव्यात आमदार सतेज पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ.नंदिनी बाभूळकर, व्ही.बी.पाटील, संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विरोधी उमेदवाराबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही. ही तत्वांची, विचारांची लढाई आहे. चारवेळा पक्ष बदललेले संजय मंडलिक छत्रपतींच्या तोडीचे उमेदवार नाहीत, त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याचे कारण नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
भाजपने आजपर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी ११६ उमेदवार बाहेरचे आहेत. इंडिया आघाडी २५० जागेवर एकास एक लढत देणार आहे. त्यामुळे भाजप २०० जागादेखील स्वबळावर जिंकू शकणार नाही. त्यामुळे केंद्रात नक्कीच परिवर्तन होईल. खासदार बदला, परिस्थिती बदलेल, असे सतेज पाटील म्हणाले. तर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकमताने दिलेली उमेदवारी म्हणजे रयतेची उमेदवारी आहे.एक जबाबदारी म्हणूनच ती स्विकारली आहे.सर्वांना विश्वासात घेऊन जिल्हयाच्या विकासाला चालना देणार आहे, असे शाहू छत्रपती म्हणाले. नंदाताईंचे भावनिक आवाहन!आज बाबासाहेब कुपेकर असते तर शरद पवारसाहेबांसाठी त्यांनी छातीची कोट केली असती. त्यामुळे आपणही अडचणीच्या काळात पवारसाहेबांच्या पाठिशी उभे असून लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा सक्रिय झालो आहोत. ६ महिन्यात कसलाही विकास होणार नाही, त्यामुळे पवारसाहेबांना साथ देण्यासाठी कुपेकरांच्या सर्व कार्यकर्त्यांनी परत यावे, असे भावनिक आवाहन डॉ.नंदिनी बाभूळकर यांनी केले.
बंटींना दंड द्यावा लागेल!पुरोगामी कोल्हापूरकर जातीयवादी शक्तींना कधीच थारा देणार नाहीत, त्यामुळे शाहू छत्रपती किमान साडेतीन लाखांच्या फरकाने विजयी होतील. त्याची जबाबदारी 'बंटीं'वर आहे. दोन लाखांच्या खाली मताधिक्य आले तर त्यांना दंड द्यावा लागेल,असा चिमटा काढत हातकणंगलेतून उद्ववसेनेच्या सत्यजित सरूडकरांना विजयी करण्याचे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.