खवल्या मांजराच्या तस्करीप्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:29 AM2021-09-04T04:29:31+5:302021-09-04T04:29:31+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. उदमांजराच्या सुळ्याची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आल्यानंतर आता ...
रत्नागिरी : जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. उदमांजराच्या सुळ्याची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आल्यानंतर आता गुहागर तालुक्यातील धोपावे येथे खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना गुरुवारी रात्री ८.३० वाजता अटक करण्यात आली आहे. महेश महिपत पवार (वय ४३, रा. आगरवायंगणी, ता. दापोली), संदेश शशिकांत पवार (३६, रा. आगरवायंगणी, ता. दापोली) आणि मिलिंद जाधव (४२, रा. धोपावे, ता. गुहागर), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
खवले मांजराची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वन विभाग आणि पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्तरीत्या ही कारवाई केली. या संशयित आरोपींकडून जिवंत खवले मांजर हस्तगत करण्यात आले आहे.
वन्यप्राणी तस्करीचे प्रकार वाढू लागल्याने वन विभागाने या गुन्ह्यांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. गुरुवारी रात्री तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जिवंत खवले मांजर, तसेच एक कार जप्त करण्यात आली आहे. या सर्व आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूरचे डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरीचे (चिपळूण) दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख व पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी प्रियांका लगड, वनरक्षक सागर गोसावी, वनरक्षक संजय रणधीर, वनरक्षक राहुल गुंठे, तसेच पोलीस हवालदार प्रशांत बोरकर, शांताराम झोरे, बाळू पालकर, वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरोचे विजय नांदेकर यांनी ही कारवाई केली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी, चिपळूण करत आहेत.
फोटो आहे. ०३०९२०२१आरटीएन०१.जेपीजी