कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्याला संरक्षण भिंतीवरून चेंडू टाकून गांजा पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी पकडले. ही घटना मंगळवारी दुपारी कारागृहाच्या उत्तरेकडील संरक्षण भिंतीनजीक घडली. वैभव विवेक कोठारी (वय २४, रा. के.पी.नगर, पुणे), संदेश नितीन देशमुख (२० रा. सुपर अप्पर परिसर, बिबवेवाडी, पुणे), अमित सुनील पायगुडे (२५, रा. बिबवेवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मित्राचा भाऊ असलेला पुण्यातील शेख नामक संशयित आरोपी मारामारीच्या गुन्ह्यात कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कच्चा कैदी म्हणून आत आहे. त्याला गांजा पुरविण्यासाठी वैभव कोठारी, संदेश देशमुख, अमित पायगुडे हे तिघे संशयित कळंबा कारागृहात येणार असल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कॉन्स्टेबल संदीप बेंद्रे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने त्यांना कळंबा कारागृहाच्या परिसरात गाठले असता कारागृहाच्या उत्तरेकडील भिंतीशेजारी तिघेजण हातात चेंडू घेऊन बसल्याचे आढळले.
पोलिसांनी त्यांना संशयावरून पकडले. त्यांच्याकडे तपासणी केली असता त्याच्याकडे मिळालेल्या चेंडूमध्ये गांजा भरल्याचे आढळले. संशयितांनी चेंडूमध्ये गांजा भरून तो कारागृहातील संरक्षण कठड्यापलीकडे असणाऱ्या मित्र कैद्याला देणार असल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील, कॉ. संदीप बेंद्रे, शाहू तळेकर, प्रदीप पाटील, अनिल ढवळे, रमेश डोईफोडे यांनी केली.चेंडू कापून भरला गांजाअटक केलेल्या संशयितांकडे तीन चेंडू आढळले. हे चेंडू मधोमध कापून त्यामध्ये प्रत्येकी पाच ग्रॅम गांजा भरून तो चेंडू चिकटपट्टीने चिकटवला होता. चेंडू कारागृहाच्या संरक्षण भिंतीपलीकडे टाकून संबंधित कैदी मित्राला त्यातून गांजा पोहोचवण्यात येणार होता. तोपर्यंत पोलिसांनी त्यांना पकडले. दरम्यान, त्यांना पकडण्यापूर्वी संशयितांनी आणखी काही चेंडू कारागृहाच्या भिंतीपलीकडे टाकले आहेत का, याचाही तपास करणार असल्याचे पो. नि. प्रमोद जाधव यांनी सांगितले.क्रिकेट खेळाचे निमित्ततिघा संशयितांना पुण्याहून अज्ञात व्यक्तीने मोटारीने मंगळवारी पहाटे सहा वाजता कोल्हापुरात आणून सोडल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्याचाही पोलीस तपास करीत आहेत.