कोल्हापूर : महापालिकेचे कोरोना केअर सेंटर्स गोरगरिबांना आधार आहेत. याठिकाणी कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार होतात. आतापर्यंत 3 हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन गेले आहेत. यामध्ये कराड येथील गंभीर अवस्थेत आलेल्या एका ५६ वर्षांच्या रुग्णाचा समावेश आहे. सलग नऊ दिवस केलेल्या उपाचारानंतर ते कोरोनामुक्त झाले. शिवाजी विद्यापीठ डीओटी सेंटरमधील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाला यश मिळाले.
कोल्हापूर जिल्ह्यासह कराड, सांगली, सिंधुदुर्ग येथील रुग्ण तेथे व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने कोल्हापूर शहरात उपाचारासाठी येत आहेत. डीओटीमध्येही अशा रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
सेंटरमध्ये १६९२ जणांना उपचार
डीओटीमध्ये एकूण नऊ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. ते चोवीस तास रुग्णांच्या सेवेत आहेत. ११ एप्रिलपासून सेंटर सुरू करण्यात आले असून, या ठिकाणी उपचार व रुग्णांचे जेवण मोफत दिले जाते. ३५० बेडची क्षमता असून, ५० ऑक्सिजन बेड आहेत. आतापर्यंत १६९२ रुग्णांनी उपचार घेतला आहे. त्यात कोल्हापूर शहरातील १०४७ रुग्णांचा समावेश आहे, तर ग्रामीण भागातील ६३१ रुग्णांनी लाभ घेतला आहे. त्याचबरोबर जिल्ह्याबाहेरील एकूण १४ रुग्ण याठिकाणी दाखल झालेले होते.
- कराडचा अत्यवस्थ रुग्ण झाला बरा -
कराडमधील एक रुग्ण व त्यांचे नातेवाईक दि.१० मे रोजी कोल्हापूर शहरात व्हेंटिलेटर बेड शोधत होते; परंतु त्यांना कोठेही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नव्हता. शिवाजी विद्यापीठ डीओटी येथे व्हेंटिलेटर बेडच्या चौकशीसाठी आले. ऑक्सिजन न मिळाल्यास त्याच्या जिवाला धोका होता. तेथील कोरोना केअर सेंटरवरील ड्यूटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यांना दाखल करून घेतले. संबंधित रुग्णाची ऑक्सिजनची पातळी ७० टक्के खाली आली होती. त्यांना तातडीने आवश्यक असलेला उपचार देण्यात आला. या सेंटरमधील डॉक्टरांच्या या विशेष प्रयत्नामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. दि.१९ मे रोजी रुग्ण पूर्णपणे बरा होऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आला.