लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी करवीर प्रांताधिकारी कार्यालयात तोबा गर्दी झाली होती. सकाळी दहापासूनच कार्यालय गर्दीने ओसंडून वाहत होते. इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने शासनाच्या सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला होता.
‘गोकुळ’साठी गुरुवार (दि. २५) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. मात्र, शनिवार ते सोमवार सलग तीन दिवस सुटी असल्याने मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. सकाळी दहापासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील निवडणूक कार्यालयात गर्दी झाली होती. दुपारी बारा वाजता तर प्रांताधिकारी कार्यालय गर्दीने ओसंडून वाहत होते. इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने गर्दीत अधिक भर पडली. प्रांताधिकारी कार्यालयाच्या बाहेरचा परिसर चारचाकी गाड्या आणि कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता.
एकीकडे कोराेनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने निर्बंध कडक केले असताना येथे मात्र अक्षरश: फज्जा उडाल्याचे दिसले.
अर्ज खरेदीसाठीही धांदल
अनेकांनी तीन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, त्यात काही त्रुटी राहिल्या तर छाननीत अवैध ठरू नये. यासाठी नवीन अर्ज घेऊन दोन-तीन अर्ज दाखल करण्याकडे इच्छुकांचा कल आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याबरोबरच अर्ज खरेदीसाठीही धांदल उडाली होती.
कार्यकर्त्यांची पोलिसांशी हुज्जत
निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या कार्यालयाच्या दारात मोठी गर्दी झाली होती. पोलीस कर्मचाऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. अखेर नावडकर यांना बाहेर येऊन कार्यकर्त्यांना कडक भाषेत सूचना द्याव्या लागल्या.
फोटो ओळी :
१) ‘गोकुळ’साठी मंगळवारी अर्ज दाखल करण्यासाठी करवीर प्रांताधिकारी कार्यालयात तोबा गर्दी झाली होती. (फोटो-३००३२०२१-कोल-गोकुळ)
२) निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी बाहेर येऊन कार्यकर्त्यांना कडक भाषेत सूचना दिल्या. (फोटो-३००३२०२१-कोल-गोकुळ०१) (छाया- आदित्य वेल्हाळ)