महापौरांबाबत आज निर्णय
By admin | Published: March 2, 2015 12:19 AM2015-03-02T00:19:36+5:302015-03-02T00:22:36+5:30
कारवाईबाबत बैठक : हसन मुश्रीफ यांनी घेतला विश्रामगृहावर आढावा
कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांना राष्ट्रवादी पक्षाने दिलेली राजीनाम्यासाठीची मुदत शनिवारी
(दि. २८) संपली. माळवी यांच्यावर पक्ष कोणती कारवाई करणार याकडे नगरसेवकांचे लक्ष लागून राहिले आहे. कारवाईबाबत रविवारी रात्री आमदार हसन मुश्रीफ यांनी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, राजेश लाटकर, विरोधी पक्षनेता मुरली जाधव यांच्याशी चर्चा केली. कारवाईचा निर्णय आज, सोमवारी जाहीर करणार असल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती.लाचखोरीच्या संशयात अडकल्यानंतर महापौर तृप्ती माळवी यांच्यावर पक्षीय कारवाई अटळ असल्याची चर्चा होती. मात्र, ९ फेब्रुवारीला राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे सहा महिन्यांसाठी महापौरपदाची खांदेपालट होणार असल्याने पक्षीय कारवाई पुढे ढकलण्यात आली. यानंतर पडद्यामागे घडलेल्या जोरदार घडामोडीनंतर महापौर माळवी यांनी राजीनामा देण्यास टाळाटाळ केली. एक महासभा व तीनवेळा विशेष सभा होऊनही महापौर राजीनामा देण्यास तयार नाहीत.
महापौरांच्या राजीनाम्यामुळे हतबल झालेल्या राष्ट्रवादीने शेवटी २८ फे ब्रुवारीची डेडलाईन दिली. तरीही महापौरांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर कोणती कारवाई करायची. महापालिकेत त्यांना विरोध करण्यासाठी कोणती व्यूहरचना आखायची याबाबत मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामगृहावर चर्चा केली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीचा तपशील सांगण्यास सूत्रांनी नकार दिला. आज, सोमवारी माळवी यांच्यावरील कारवाईबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले.
ंअडवणुकीसाठी व्यूहरचना
माळवी यांची पक्षातून हकालपट्टी केली तरी त्यांच्या पदास कोणताही धोका नाही. त्यांच्यावर कारवाई करून पक्षाचे काँग्रेससोबत ताणलेले संबंध सुधारण्यास मदत होईल. माळवी यांना सभागृहात व सभागृहाबाहेर अडवणूक करण्याबाबतच्या व्यूहरचनेसह सर्व शक्यतांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.