कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात उद्या, सोमवारी सकाळी दहाला गांधी मैदानातून मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर, श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट व अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी आज, रविवारी पत्रकार परिषदेत दिली.देवस्थान समीतीकडे अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिरासह ३०६४ मंदिरे व २३ हजार एकर जमिनी, अलंकार, रोख रक्कम अशी कोट्यवधींची संपत्ती आहे. समितीच्या अध्यक्षांनी, सदस्यांनी व कर्मचाऱ्यांनी, शासकीय अधिकाऱ्यांनीही कारभारात प्रचंड भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. संबंधितांना कठोर शासन व्हावे व या कारभाराची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा काढला आहे. हा मोर्चा बिंदू चौकात विसर्जित होईल. त्यानंतर विविध संघटनांचे पदाधिकारी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देतील. या मोर्चाला विविध तरुण मंडळे, तालीम मंडळे, हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक संस्थांनी पाठिंबा दर्शविल्याचे संयोजकांनी सांगितले. (प्रतिनिधी)अधिवेशनात लक्षवेधी मांडणार : क्षीरसागर देवस्थान समितीवरील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या धेंडांनी जमिनी बळकावल्या आहेत. युती सरकारने दोषींवर कारवाई करून सध्याची समिती बरखास्त करावी. ही समिती नव्याने स्थापन करावी, यासाठी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करावा : देसाईप्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई म्हणाले, देवस्थान समितीतील भ्रष्टाचाराचे पुरावे परीक्षण समितीला मी दिले होते. मात्र, त्याची समिती व प्रशासनानेही दखल घेतलेली नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न शासनदरबारी मांडला होता. आता सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांनी याचा पाठपुरावा केलेला नाही.
देवस्थान समिती विरोधात आज मोर्चा : राजेश क्षीरसागर
By admin | Published: February 02, 2015 12:21 AM