आजची ज्योतिबा यात्रा रद्द, पालखी सोहळ्यासह धार्मिक विधी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:22 AM2021-04-26T04:22:48+5:302021-04-26T04:22:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि जिल्ह्यात पुकारण्यात आलेली संचारबंदी या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि जिल्ह्यात पुकारण्यात आलेली संचारबंदी या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने आज, सोमवारी होणारी श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ज्या २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत यात्रेतील धार्मिक विधी व मुख्य पालखी सोहळा साजरा केला जाणार होता. त्यातील पाच मानकरी कोरोनाबाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आता हा सोहळा १६ मानकऱ्यांसह देवस्थान समितीचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी अशा ४५ जणांच्या उपस्थितीत होणार आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त होणारा मुख्य पालखी सोहळा व धार्मिक विधी केवळ २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत घेण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी मंदिर परिसरात उपस्थित राहणाऱ्या २१ मानकऱ्यांसह देवस्थान समितीचे कर्मचारी, बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांची अँटिजेनसह आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात पाच मानकऱ्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा प्रशासक जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केवळ १६ मानकऱ्यांसह एकूण ४५ जणांच्या उपस्थितीत हा सोहळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच यात्रा रद्द करण्याचा निर्णय समितीने घेतला होता.
सलग दुसऱ्या वर्षी ही यात्रा रद्द होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्योतिबा डोंगराकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहेत. याशिवाय एक पोलीस अधीक्षक, चार पोलीस निरीक्षकांसह ३०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटाही शनिवारी मध्यरात्रीपासूनच तैनात करण्यात आला आहे.
--------------------------------
देवस्थानतर्फे लाईव्ह दर्शनाची सोय
संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो भक्तांचे श्री ज्योतिबा हे श्रद्धास्थान आहे. त्यात संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी भक्तांना ज्योतिबाची भेट घेता येणार नाही. त्यामुळे हजारो भक्त दर्शनाची आस लावून बसले आहेत. ही बाब जाणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यात्रेनिमित्त होणारे धार्मिक विधी व पालखी सोहळ्याचे थेट फेसबुकच्या माध्यमातून प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे.