जोतिबा डोंगरावरील आजची श्रावण षष्ठी यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:29 AM2021-08-13T04:29:12+5:302021-08-13T04:29:12+5:30
कोल्हापूर : जोतिबा डोंगरावरील (वाडी रत्नागिरी) चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा आज, शुक्रवारी व शनिवारी होत आहे, पण ...
कोल्हापूर : जोतिबा डोंगरावरील (वाडी रत्नागिरी) चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा आज, शुक्रवारी व शनिवारी होत आहे, पण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धार्मिकस्थळे उघडण्यास मनाई असल्याने पारंपरिक पद्धतीने देवीचे मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होत आहे. जिल्हा प्रशासन, ग्रामस्थ, पुजारी मंडळ यांच्यावतीने जोतिबा डोंगरावरील श्रावण षष्ठी यात्रा रद्द केली आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी डोंगरावर सोडण्यात येणार नसल्याने भाविकांनी येऊ नये, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
जोतिबा डोंगरावर दरवर्षी चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा भरते. हजारो भाविक डोंगरावर दर्शनासाठी येतात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी ही यात्रा रद्द केली आहे. यात्रेसाठी भाविकांना परवानगी नाकारली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन व भाविकांचा प्रवेश रोखण्याकरिता जोतिबा डोंगरावर जाणारे सर्व मार्ग नाकाबंदी करून रोखण्यात आले आहेत.
चोपडाई देवीचे ऑनलाईन दर्शन
श्रावण षष्ठी यात्रेनिमित्त जोतिबा डोंगरावर भाविकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे चोपडाई देवीच्या मंदिरात होणारे धार्मिक विधी हे भाविकांना ऑनलाईनवर दिसणार आहेत. त्यामुळे भाविकांना घरबसल्या दर्शन घ्यावे लागणार आहे.