कोल्हापूर : पुणे पदवीधर, शिक्षक निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. जागावाटपासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होणार असून उद्या निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील या दोन्ही मतदारसंघांतील काँग्रेस पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी दुपारी काँग्रेस समितीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.मंत्री पाटील म्हणाले, अचानक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने हातात फारच कमी वेळ राहिला आहे. या दोन्ही निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढतील, असे वरिष्ठ पातळीवर ठरले आहे. जागा वाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू असून दोन दिवसांत अंतिम तोडगा निघणार हे. हा निर्णय राज्यासाठी असल्याने कोणी कोणत्या जागा लढवायच्या याचा निर्णय देखील याच बैठकीत अपेक्षित आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह घटकपक्ष ही निवडणूक एकदिलाने लढविणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, गुलाबराव घोरपडे आदी प्रमुख उपस्थित होते.इच्छुकांची संख्या मोठीपुणे विभागातंर्गत येणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या सर्वांचे मागणी अर्ज पक्षाकडे आले आहेत. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे या पाच जिह्यांतील इच्छुकांच्या मुलाखती उद्या, गुरुवारी कोल्हापुरात होणार आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील,बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटीत मुलाखती होणार आहेत.महाविकास विरुद्ध भाजप सामनामहाविकास आघाडीने भूमिका स्पष्ट केल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आघाडी असाच सामना रंगणार आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापनेला वर्षपूर्ती होत असतानाच पहिल्यांदाच महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने या आघाडीसाठी ही निवडणूक लिटमस टेस्टच असणार आहे.