कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांंकरिता झालेल्या राज्य ग्राहक परिक्रमा खंडपीठाचा प्रारंभ उद्या, सोमवारी ताराबाई पार्क येथील छत्रपती शाहू सभागृहात सकाळी नऊ वाजता होणार आहे. यावेळी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री गिरीश बापट, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश आर. सी. चव्हाण, माजी अध्यक्ष एस. बी. म्हसे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन. जे. जमादार, जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष संजय बोरवाल, आदींची प्रमुख उपस्थिती आहे. कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील दक्षिण बाजूस या खंडपीठाचे कामकाज सुरू राहणार आहे.कोल्हापूर येथे राज्य ग्राहक परिक्रमा खंडपीठ व्हावे यासाठी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कंझ्युमर प्रॅक्टिशनर बार असोसिएशनने गेल्या २० वर्षांपासून ही मागणी लावून धरली होती. माजी न्यायाधीश एस. बी. म्हसे यांनी खंडपीठाच्या कामकाजाकरिता व ग्राहक न्यायालयाच्या स्वतंत्र सभागृहासाठी निधी उपलब्ध करून दिला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आर. सी. चव्हाण यांनी पाठपुरावा केला. प्रलंबित कामांची सुनावणी होणारया परिक्रमा खंडपीठामध्ये मुंबई येथील राज्य आयोगाकडील प्रलंबित असलेली अपिलाची कामे सुनावणीकरिता २ ते ५ मार्चअखेर सकाळी साडेदहा वाजल्यापासून ठेवण्यात येणार आहेत. तसेच यापुढे पाच जिल्ह्यांतील अपिले, राज्य आयोगाकडे दाखल होणाऱ्या तक्रारी येथे दाखल होणार आहेत.
ग्राहक आयोग परिक्रमा खंडपीठाचे उद्या उद्घाटन
By admin | Published: March 02, 2015 12:09 AM