शिरोळ : शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावरील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्ता रुंदीकरण करण्यात येत असल्यामुळे वारंवार याठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीची कोंडी दूर करण्याची गरज आहे.
--
मातीच्या ढीग अद्यापही रस्त्यावरच
जयसिंगपूर : येथील अकराव्या गल्लीतील इंगळे पॉलिक्लिनिकसमोरील रस्त्यावर ड्रेनेजचे काम करण्यात आले होते. दरम्यान, त्यावेळी मातीचा ढीग रस्त्यावर टाकण्यात आला होता. मात्र, अद्यापही तो ढीग रस्त्यावर असल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे पादचा-यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
---- हेरवाडमध्ये दोन रुग्णांना डिस्चार्ज
कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील माऊली कोविड सेंटरमधून दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. गेल्या सात दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारानंतर ते रुग्ण कोविडमुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले. यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रथमेश पाटील, सौरभ पाटील, गिरीश पाटील, रावसाहेब पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
-
नलिनी देसाई यांची सामाजिक बांधिलकी
जयसिंगपूर : दुर्गा सहेलीच्या अध्यक्षा नलिनी देसाई यांनी आपल्या वाढदिनी घरी काम करणा-या महिलेच्या मुलीला शिलाई मशिन भेट देवून सामाजिक बांधिलकी जोपासली. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. त्यांनी दिलेल्या या मदतीमुळे त्या मुलीने त्यांचे आभार मानले. याप्रसंगी डॉ. स्नेहल कुलकर्णी, अश्विनी नरुटे, अरुणा गुंडे, गंगा तहसीलदार, प्रतिभा ढापरे उपस्थित होत्या.