कारवाईच्या भीतीने व्यापारी नरमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:29 AM2021-07-14T04:29:42+5:302021-07-14T04:29:42+5:30
कोल्हापूर : कोरोनासंबंधीचे निर्बंध झुगारुन दुकाने सुरु केल्यास प्रशासनाकडून कारवाई होईल या भीतीने शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरु करण्याचा आपला ...
कोल्हापूर : कोरोनासंबंधीचे निर्बंध झुगारुन दुकाने सुरु केल्यास प्रशासनाकडून कारवाई होईल या भीतीने शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरु करण्याचा आपला निर्धार सोडून दिला. त्यापेक्षा मागील दाराने व्यवसाय सुरु केला तर कारवाई टळेल आणि आपला व्यवसाय देखील होईल अशी सामंजस्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येते.
कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग गेल्या एक महिन्यापासून कायम असून रोज सरासरी १५०० ते २००० पर्यंत रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे पॉझिटिव्हीचा दर कमी येत असल्याचे दिसत असले तरी परिस्थिती गंभीरच आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील निर्बंध उठविण्याच्या मन:स्थितीत नाही. तरीही मागच्या आठवड्यात व्यापारी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी यांनी दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्याचा आग्रह धरला होता.
त्यामुळे पाच दिवस प्रायोगिक तत्त्वावर सरसकट सर्वच दुकाने सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत उघडण्यास परवानगी दिली. परंतु या पाच दिवसात रुग्णसंख्या काही कमी होताना दिसली नाही. त्यामुळे सोमवारपासून प्रशासनाने पुन्हा निर्बंध घातले. काही व्यापारी दुकाने सुरु करा असा आग्रह धरत होते; परंतु बहुतांशी व्यापारी कारवाई होण्यापेक्षा आणखी काही दिवस प्रतीक्षा केलेली बरी म्हणून आपले व्यवसाय, दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
मात्र तरीही काही ठिकाणी बंद दाराआडून किंवा मागील दारातून व्यवसाय सुरु ठेवले आहेत. त्याकडे जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाचेही थोडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येते.
फोटो क्रमांक - १३०७२०२१-कोल-बाजारपेठ
ओळ - कोल्हापूर शहरातील विविध रस्त्यावर नागरिकांची गर्दी झालेले पाहायला मिळते. कोरोनाचे संकट झुगारुन मंगळवारीसुद्धा गर्दी कायम होती.