सतीश धुमाळ, क्षीरसागर, पांगारकर यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 03:15 PM2020-10-03T15:15:47+5:302020-10-03T15:18:47+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी डॉ. विजया पांगारकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्यासह भुदरगडचे तहसीलदार अमोल कदम यांची बदली झाली. भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांना मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली.
कोल्हापूर : जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी डॉ. विजया पांगारकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्यासह भुदरगडचे तहसीलदार अमोल कदम यांची बदली झाली.
भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांना मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली.
गुरुवारी (दि. १) मंत्रालयातून महसूल विभागाने बदल्यांचे आदेश काढले. कोल्हापूरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांची सातारा येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्रमांक १६), उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांची सोलापूर येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्रमांक ११) म्हणून बदली झाली.
गडहिंग्लजच्या उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांची बदली झाली असली तरी त्यांना अद्याप पद देण्यात आलेले नाही. त्यांच्या जागेवर सांगलीचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्रमांक ९) बाबासाहेब वाघमोडे यांची बदली झाली. वाघमोडे यांनी यापूर्वी करवीर तहसीलदार म्हणून काम केले आहे.
त्याचबरोबर यापूर्वी कोल्हापुरात काम केलेल्या उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, स्नेहल भोसले, शैलेश सूर्यवंशी, विक्रांत चव्हाण यांच्याही बदल्या झाल्या आहेत. सांगलीच्या तहसीलदार अश्विनी वरुटे यांची भुदरगडचे तहसीलदार म्हणून तर या पदावर कार्यरत असलेले अमोल कदम यांची कोरेगाव (जि. सातारा) येथे बदली झाली आहे.
गडहिंग्लजचे तहसीलदार दिनेश पारगे यांच्या जागी सांगलीचे तहसीलदार (सर्वसाधारण) रामलिंग चव्हाण यांची बदली झाली आहे. जावळीचे (जि. सातारा) तहसीलदार शरद पाटील यांची इचलकरंजी येथे अप्पर तहसीलदार म्हणून बदली झाली.