कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाच्या महसूल जत्रेअंतर्गत कूळ कायदा कलम ४३ ची अट कमी केल्याने सहा महिन्यात २ हजार ६७४ हेक्टर जमीन बंधनमुक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तितक्याच शेतकऱ्यांची अंदाजे प्रत्येकी १ हेक्टर याप्रमाणे ही जमीन वर्ग १ झाली आहे. कार्यवाही अंतर्गत घेतल्या गेलेल्या ६ हजार ६८२ गटांपैकी ४ हजार ८ प्रकरणातील जमिनींबाबत कामकाज सुरू आहे तर १० हजार ४९७ गटांचे अर्ज रद्द करण्यात आले आहे.
महसूल विभागाचा पारदर्शी व्हावा, नागरिकांना कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सहा महिन्यापूर्वी महसूल जत्रा हा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत महसूल विभागाची संबंधित ११६ विषय घेण्यात आले असून प्राधान्याने कूळ कायदा कलम ४३ हटवण्याचा विषय घेण्यात आला. ज्या जमिनीवर कोर्टकचेरी सुरू नाही, ज्यांना ३२ एम प्रमाणपत्र मिळून १० वर्षे झाली त्यांच्यासाठी ही कूळ कायद्याची अट रद्द केली जात आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला त्यावेळी या कामाने गती धरली होती, या सहा महिन्याच्या कालावधीत मात्र कूळ कायदा, पाणंद रस्ते या महत्त्वाच्या विषयांमध्ये मोठे काम झाले आहे. मात्र मागील महिन्यापासून पुन्हा संसर्ग वाढल्याने महसूलच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची ड्युटी लागल्याने या विषयातील कामांना विलंब होत आहे.
---
तालुका : आलेले अर्ज : रद्द झालेले गट : शिल्लक गट : मंजूर झालेले गट
शाहुवाडी : ५७३ : ३५७: २१६ : ९४
पन्हाळा : ८०१ : ४५९ : ४३२ : ३५०
हातकणंगले : ८२० : ५२९ : २९१ : २४६
शिरोळ : १ हजार ६०८ : १ हजार २६७ : ४३१ : २६४
करवीर : १ हजार २९९ : ६२६ : ६७३ : ११९
गगनबावडा : २०३ : १५ : १८८ : २६
राधानगरी : ९९० : ५९६ : ३९४ : २५२
कागल : ८४३ : ४३७ : ४०६ : ४४
भुदरगड : १ हजार ५४ : ४१९ : ६३५ : ४३४
आजरा : ८१७ : २३० : ५८७ : ५४२
गडहिंग्लज : २ हजार १३७ : ८८० : १ हजार २५७ : ४२
चंदगड : ५ हजार २९० : ४ हजार ३०० : ९९० : ९९
इचलकरंजी : ५६४ : ३३२ : १८२ : १६२
एकूण : १७ हजार १७९ : १० हजार ४९७ : ६ हजार ६८२ : २ हजार ६७४
--
एकूण सज्जे : ४३९
एकूण गावे : ९३३
एकूण गट : ६ हजार ६८२
एकूण क्षेत्र : ६ हजार ९४८.२४ (हेक्टर.आर)
आकारणी : ४३ हजार २१५
एकूण खातेदार : ३९ हजार ४०८
---
प्राधान्याने घेतलेली पाच प्रकरणे
- कूळ कायदा कलम ४३ ची अट रद्द करणे
-पाणंद रस्ते खुले करणे
-अज्ञान पालनातील फेरफार
-आरआरसी वसुली, महसुली प्रमाणपत्र
-जमीन विभागणी (वाटप दरखास्त)
--