कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पावसाचा जोर शुक्रवारी कमी राहीला. शहरातही उघडझाप होऊन काहीकाळ सुर्यदर्शनही झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी इंचा-इंचाने कमी होऊन ती सायंकाळपर्यंत ४२.१० फूटांवर राहीली.
दुपारी राधानगरी धरण १००टक्के भरुन क्रमांक ३ व ६ चे स्वयंचलित दरवाजे उघडून विद्युतविमोचकासह ४४५६ क्युसेक्स विसर्ग सुरु करण्यात आला. तसेच दुधगंगा धरणाचाही दुपारी २००० क्युसेक्स विसर्ग वाढविण्यात आला आहे. ‘राधानगरी’तील पाणी शनिवारी पहाटेपर्यंत कोल्हापूर शहरापर्यंत येणार असल्याने पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात महापूराचे सावट आहे. शुक्रवारी पावसाचा जोर कमी राहीला. शहरात दिवसभर पावसाची उघडझाप होऊन काही काळ सुर्यदर्शनही झाले. शहरातील सुतारवाड्यासह सखल भागातील पाणी अद्याप उतरले नव्हते.
जिल्ह्यातील अद्याप ६० बंधारे पाण्याखाली असून राज्यमार्ग ३, प्रमुख जिल्हा ९, ग्रामीण १५ व इतर जिल्हा २० असे ४७ मार्ग बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. एस. टी.चे १२मार्ग अंशत: बंद राहिले. रेडेडोह येथे पाणी असल्याने शिवाजी पूल येथून बंद करण्यात कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग तिसऱ्या दिवशीही बंद राहीला.धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी असला तरी राधानगरी धरण दुपारी तीन वाजता शंभर टक्के भरुन क्रमांक ३ व ६ चे स्वयंचलित दरवाजे उघडले. येथून ४,४५६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. हे पाणी शनिवारी सकाळपर्यंत शहरात येऊन पंचगंगेची पाणी पातळी वाढून पुराचा धोका आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुन्हा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधारा येथे शुक्रवारी इंचाइंचाने कमी होत राहीली. सायंकाळपर्यंत सात इंचांनी कमी होऊन ती ४२.१० फूटांवर राहीली.