जोतिबा यात्रेत दोन घटनात दोघांचा मृत्यू, दोघे जखमी
By उद्धव गोडसे | Published: April 5, 2023 09:15 PM2023-04-05T21:15:03+5:302023-04-05T21:15:08+5:30
मृत कडेगाव, मुंबईचे; जखमी सांगली जिल्ह्यातील
कोल्हापूर : जोतिबा यात्रेसाठी वाडी रत्नागिरी येथील डोंगरावर आलेला भाविक प्रमोद धनाजी सावंत (वय २०, रा. भिकवडी, ता. कडेगाव, जि. सांगली) याचा बुधवारी (दि. ५) सकाळी दरीत पड़ून मृत्यू झाला. दुसरे भाविक संजय दत्तात्रय शिंदे (वय ५९, रा. भांडूप, मुंबई) यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मानाच्या सासनकाठ्या मंदिरातून बाहेर जाताना कमानीचे दगड पडून दोन भाविक जखमी झाले. सूरज हणमंत उधाळे (वय २७) आणि अथर्व विजय मोहिते (वय १८, दोघे रा. बहे बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली) अशी जखमींची नावे आहेत.
जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी बुधवारी डोंगरावर लाखो भाविकांची गर्दी जमली होती. मित्र आणि नातेवाईकांसोबत यात्रेसाठी डोंगरावर पोहोचलेला प्रमोद सावंत हा तरुण पहाटे पावणेसहाच्या सुमारास दक्षिण बाजूच्या डोंगर उतारावर गेला. त्यावेळी अंधारात अंदाज न आल्याने तो सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळला. त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सकाळी सव्वाआठच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुंबईहून आलेले भाविक संजय शिंदे हे सकाळी पावणेदहाच्या सुमारास डोंगरावर चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
मंदिराच्या आवारातील मानाच्या सासनकाठ्या बाहेर जाताना सासनकाठीचा धक्का लागल्याने उत्तर दरवाजातील कमानीचे काही दगड कोसळले. यावेळी भिंतीलगत उभे असलेले सूरज उधाळे आणि अथर्व मोहिते यांच्या डोक्यात दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले. सूरज याच्यावर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले, तर अथर्व याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ही दुर्घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.