Kolhapur: ए.एस ट्रेडर्स फस‌वणुकीतील दोन संचालकांना अटक, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 

By उद्धव गोडसे | Published: August 8, 2023 07:15 PM2023-08-08T19:15:54+5:302023-08-08T19:19:06+5:30

एकास नांदेडमधून केली अटक

Two directors arrested in AS Traders scam in Kolhapur, Financial Crimes Investigation Branch action | Kolhapur: ए.एस ट्रेडर्स फस‌वणुकीतील दोन संचालकांना अटक, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 

Kolhapur: ए.एस ट्रेडर्स फस‌वणुकीतील दोन संचालकांना अटक, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 

googlenewsNext

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणा-या ए.एस ट्रेडर्स कंपनीच्या दोन संचालकांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज, मंगळवारी (दि. ८) अटक केली. बाबासो भूपाल धनगर (वय ३०) आणि बाळासो कृष्णात धनगर (वय ५५, दोघे रा. बहिरेवाडी, ता. पन्हाळा) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. बाबासो याला पोलिसांनी नांदेडमधून अटक केली, तर बाळासो याला बहिरेवाडी येथील घरातून अटक केली.

आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून एएस ट्रेडर्स फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास गतिमान झाला असून, काल, सोमवारी दोन संचालकांना अटक केली. नांदेडमधील वजिराबाद पोलिस ठाण्यात जानेवारी २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून नांदेड पोलिस ए.एस. ट्रेडर्सच्या पाच संशयितांच्या मागावर होते. त्यापैकी बाबासो धनगर हा आठवड्यापूर्वी नांदेड पोलिसांच्या हाती लागला.

कोल्हापुरातील गुन्ह्यातही त्याचा सहभाग असल्याने आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. ७) रात्री नांदेड पोलिसांकडून त्याचा ताबा घेतला. मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बहिरेवाडी येथून दुसरा संशयित बाळासो धनगर याला मंगळवारी दुपारी अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाईल.

बाबासो हा नांदेडमधील कंपनीचा संचालक आहे, तर बाळासो हा कोल्हापुरातील एएस ट्रेडर्सचा संचालक आहे. गुन्हे दाखल होताच अटक टाळण्यासाठी हे दोघे पळाले होते. अखेर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्या पथकाने दोन्ही संचालकांच्या मुसक्या आवळल्या. दोघांच्या अटकेमुळे गुन्ह्यातील महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Two directors arrested in AS Traders scam in Kolhapur, Financial Crimes Investigation Branch action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.