कारागृहातून पलायन केलेले दोघा कैद्यांच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:26 AM2021-05-26T04:26:31+5:302021-05-26T04:26:31+5:30
कोल्हापूर : खून आणि दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील दोघा न्यायालयीन बंदीनी कळंबा कारागृहाच्या तात्पुरत्या कारागृहाची सुरक्षा यंत्रणा भेदून दि. ...
कोल्हापूर : खून आणि दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील दोघा न्यायालयीन बंदीनी कळंबा कारागृहाच्या तात्पुरत्या कारागृहाची सुरक्षा यंत्रणा भेदून दि. १४ मे रोजी मध्यरात्री पलायन केले होते. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी हातकणंगले ते इचलकरंजी रोडवर हातकणंगलेच्या हद्दीत दोघांना शेतात लपलेल्या अवस्थेत मंगळवारी दुपारी पकडले. प्रतीक सुहास सरनाईक (वय ३०, रा. आर. के. नगर, पाचगाव रोड, साई कॉलनी, कोल्हापूर), गुंडाजी तानाजी नंदीवाले (२८, तमदलगे, शिरोळ, जि. कोल्हापूर) अशी त्या कच्च्या कैद्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या आयटीआयमधील आपत्कालीन कारागृहात खून आणि दरोडा या गंभीर गुन्ह्यातील न्यायालयीन बंदी असलेले प्रतीक सरनाईक व गुंडाजी नंदीवाले हे कोरोनावर उपचार घेत होते. दोघांनी खिडकीचे लोखंडी गज वाकवून पलायन केले. पोलिसांची तीन पथके त्यांचा शोध घेत होती. नंदीवाले याचे मूळ गाव तमदलगे (ता. शिरोळ) असल्याने ते दोघेही हातकणंगलेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने त्यांना हातकणंगलेत परमिट रूमच्या पाठीमागे शेतात पकडले. दोघांची आज, बुधवारी कोरोना तपासणी होणार आहे.
गारगोटीतील आर्मी कॅम्पमधून मिळाला आरोपींचा माग
कैद्यांनी कोल्हापुरातील शेंडा पार्क, पाचगाव परिसरासह कळंबा, निगवे, मडीलगे, मुरगुड, माद्याळ, कापशी, गडहिंग्लज व कागल असा पायी प्रवास केला. नंदीवाले या कैद्याने पूर्वी भुदरगडमध्ये आर्मी अकॅडमीत प्रशिक्षण घेतले होते. जुन्या मित्रांकडे आश्रयाला दोघे गेले. मुरगुडमध्ये मित्राकडे चहा-नाश्ता केला, माद्याळ येथे मित्राच्या घरात जेवले, मित्राच्या वडिलांना शंका आल्याने दोघांना हाकलले. त्यानंतर ते हातकणंगलेत शेतात लपल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे त्यांना पकडले.
मुलीला पाहण्याची इच्छा अपुरी
गुंडाजी नंदीवाले याला जून २०१९ मध्ये अटक झाली. पुढील दोन आठवड्यात त्याच्या पत्नीला कडेगाव (ता. कडेगाव, जि. सांगली) येथे माहेरी मुलगी झाली. गुंडाजी याची मुलीला पहाण्याची तीव्र इच्छा होती, त्यामुळे तो कडेगाव येथे जाण्याच्या तयारीत होता. पण तोपर्यंतच पोलिसांनी त्यांना अटक केली.
तपास पथकास बक्षीस
पो.नि. तानाजी सावंत यांनी स्वत:सह सहा. पो. नि. सत्यराज घुले, उपनिरीक्षक विनायक सपाटे, सुरेश पाटील, असिफ कलायगार, विनोद कांबळे, राम कोळी, अमोल कोळेकर, अजित वाडेकर, उत्तम सडोलीकर, अर्जुन बंद्रे, नितीन चौथे, सागर कांडगावे, महादेव कुर्हाडे, अनिल जाधव, अजय काळे, संतोष पाटील, अमर वासुदेव, सुरेश राठोड यांनी अकरा दिवसात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या तपास पथकाच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अप्पर अधीक्षक तिरुपती काकडे यांनी कौतुक करत २० हजाराचे बक्षीस जाहीर केले.
फोटो नं. २५०५२०२१-कोल-गुंडाजी नंदीवाले (आरोपी)
फोटो नं. २५०५२०२१-कोल-प्रतिक सरनाईक (आरोपी)
===Photopath===
250521\25kol_4_25052021_5.jpg~250521\25kol_5_25052021_5.jpg
===Caption===
फोटो नं. २५०५२०२१-कोल-गुंडाजी नंदीवाले (आरोपी)फोटो नं. २५०५२०२१-कोल-प्रतिक सरनाईक (आरोपी)~फोटो नं. २५०५२०२१-कोल-गुंडाजी नंदीवाले (आरोपी)फोटो नं. २५०५२०२१-कोल-प्रतिक सरनाईक (आरोपी)