गांधीनगर : पंचगंगा नदीला आलेल्या महापुराचे पाणी गांधी नगरातील काही नागरिकांच्या घरात शिरले. त्या पाण्याबरोबर काही सरपटणारे प्राणीही घरात शिरले असून, कोयना कॉलनी व कुटिया मंदिर या परिसरातील घरांमधून सर्पमित्र स्टीफन बिरांजे यांनी दोन नागांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. गांधीनगर परिसरातील कोयना कॉलनी, कुटिया मंदिर या भागाला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. दरम्यान, पुराच्या पाण्यातून वाहून आलेल्या व घरात आश्रय घेतलेल्या दोन नागांना पकडून बिरांजे यांनी निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले आहे. बिरांजे हे गेल्या १५ वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करतात. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असतानाही त्यांनी समाजकार्य सुरू ठेवले आहे. जवळपास दहा ते पंधरा हजार नाग, घोणस, फुरसे, धामण, मण्यार, अजगर अशा विषारी व बिनविषारी सापांना पकडून त्यांना जीवदान दिले आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक, सांगली येथेही विनामोबदला सामाजिक बांधिलकीतून ही सेवा अविरत सुरु ठेवली आहे.
फोटो : ३१ गांधीनगर नाग
गांधीनगर येथे पुराच्या पाण्यातून वाहून आलेल्या व घरात आश्रय घेतलेल्या नागाला पकडून स्टीफन बिरांजे यांनी त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.