ट्रॅक्टरला धडकून दोघे विद्यार्थी ठार
By admin | Published: February 24, 2016 01:04 AM2016-02-24T01:04:12+5:302016-02-24T01:04:12+5:30
साखरी येथील घटना : शाळेतून घरी परतताना सायकलवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
गगनबावडा : शाळा सुटल्यानंतर घरी जाताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला सायकल धडकून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अविनाश रंगराव पाटील (वय १३, रा. म्हाळुंगे) आणि पृथ्वीराज भरत सूर्यवंशी (वय १४, रा. तिसंगी पैकी बालेवाडी) अशी त्यांची नावे आहेत. साखरी येथील घाटगे वसाहती समोरील वळणावर मंगळवारी सकाळी ९.४५ च्या दरम्यान हा अपघात झाला. याबाबत सरपंच नामदेव चौगले यांनी साळवण पोलिसांत वर्दी दिली.
याबाबतची अधिक माहिती अशी, मंगळवारी सकाळी शाळा सुटल्यानंतर पृथ्वीराज सूर्यवंशी हा अविनाशला सोडण्यासाठी सायकलवरून जात होता. कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्गावर साखरी व तिसंगीच्या दरम्यान घाटगे वसाहती समोरील वळणावर त्याचे सायकलवरील नियंत्रण सुटल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला त्याची सायकल धडकली. त्यामुळे अविनाश हा ट्रॉलीच्या चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाला. तर रस्त्यावर जोरात डोके आपटल्याने पृथ्वीराजचा मृत्यू झाला.
दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ कार्यक्रम असल्याने दत्ताजीराव मोहिते-पाटील माध्यामिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सकाळीच सोडण्यात आले होते. अविनाश हा सातवीत, तर पृथ्वीराज हा आठवीत शिकत होता.
अपघाताची बातमी समजताच शाळकरी विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मृतदेह बंकट थोडगे यांच्या अॅम्ब्युलन्समधून कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये नेण्यात आले. सकाळी हसत खेळत गेलेली मुले रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे चित्र बघितल्याने सर्व नातेवाईक आक्रोश करीत होते. घटनास्थळी प्रभारी तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी भेट दिली.अपघात झालेल्या वळणावरती रस्ता उताराचा असल्यामुळे सायकलवरील नियंत्रण सुटल्यानेच अपघात झाल्याची चर्चा होती.अपघाताची नोंद गगनबावडा पोलीस ठाण्यात झाली आहे.