विक्रम पाटीलकरंजफेण : पुरूषांची मक्तेदारी असलेल्या दूध डेअरीच्या व्यवसायात पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे येथील दोन रणरागिणींनी सक्रीय सहभाग घेऊन दूध डेअरीचा व्यवसाय यशस्वीपणे चालवून दाखविला आहे. शेणाघाणीपासून व दुधाच्या धारा काढण्याच्या कामापुरत्या मर्यादित न रहाता दूध डेअरीचा कारभार आम्हाला देखील सुरळीत चालवता येतो हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देऊन चांगल्या प्रकारे कारभार कसा चालवावा याचे देखील उदाहरण घालून दिले आहे.खेड्यापाड्यात जणावरासाठी लागणारा ऊसाचा पाला काढण्यापासून ते जणावरांच्या शेणाघाणीपासून दुधाच्या धारा काढून डेअरीत दूध घालण्यापर्यंत सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत महिलांचे हात गुंतलेले असतात.मात्र दूध व्यवसायात पुरूषांचीच मक्तेदारी अनेक वर्षापासून टिकून राहिली असल्याने अनेक ठिकाणी पुरूष देईल तो हिशोब कष्टकरी महिलांना निमूटपणे सहन करावा लागतो. अशाच घटनेतून नणुंद्रे येथील दोन महिला पाच वर्षापूर्वी पुढे आल्या. अन् दूध डेअरीतून पुरूषांना बाजूला सारून दोघींनी डेअरीचा कारभार आपल्या ताब्यात घेत अगदी सुरळीतपणे चालवून दाखविला.नणुंद्रे येथील स्व.तुकाराम बाऊचकर यांनी स्थापन केलेल्या श्री.कृष्ण दुध संस्थेचा कारभार अनेक वर्षे पुरूष मंडळींच्या हातात होता. मात्र पाच वर्षापूर्वी कष्टकरी महिलांना तो मान्य नसल्यामुळे त्यांनी आवाज उठविला. त्यावेळी जेमतेम दहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या रेखा बाऊचकर यांनी सचिव पदाची तर जयश्री बाऊचकर यांनी मापाडी म्हणून कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी पेलण्याची सहमती दर्शविली. दूध संकलण करून ते वारणा संघाला पोहचवणं व त्याचा वेळच्यावेळी हिशोब ठेऊन उत्पादकांना मोबदला देण हे सार त्यांच्यासाठी नवीनचं होते. लिलया पार पाडू लागल्या कामे संगणक हाताळण्याचे जरा देखील त्यांना ज्ञान नव्हते. तरी देखील या दोन रणरागिणींनी सर्व ज्ञान आत्मसात करून घेतले व दोन्ही सत्रात संकलन करून दुधाची उत्पादन क्षमता तब्बल ३५० लिटर पर्यंत नेऊन पोहचवलीयं, दूध संकलन करून झाल्यावर दुधाने भरलेली कॅन टेंपोत टाकण्यापर्यंत त्या कामे लिलया पार पाडू लागल्या. प्रामाणिक कष्टाला बळ म्हणून रेखा बाऊचकर यांना दोन वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत पार्टीने भरघोस मतांनी निवडून आणून सदस्य पदाची जबाबदारी देखील सोपवली.
दूध संस्था लाखो रूपये नफ्यात
या दोघी दूध उत्पादकांच्या कष्टाचा रूपया अनं रूपया कष्टकरी उत्पादकांच्या पदरात कसा पडेल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. दोघींच्या प्रयत्नाने व्यवहार पारदर्शी बनला असल्याने दूध संस्था लाखो रूपये नफ्यात आणून सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. त्यातूनच या दोघींनी इतरांच्यासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.