प्रजासत्ताक दिनी अनोखा उपक्रम; दांडपट्टयाने कापले 4001 लिंबू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 05:29 PM2020-01-26T17:29:38+5:302020-01-26T17:35:06+5:30
शांतीदूत मर्दानी खेळाचा आखाड्याचा वर्धापन दिन
कोल्हापूर : हलगी घुमक अन कैताळाच्या दणदणाट... छत्रपती शिवाजी महाराज की जय...असा अखंड जयघोष...अशा स्फूर्तीदायी वातावरणात
शांतीदूत मर्दानी खेळाच्या आखाड्याचा मावळा गफूर रेहाना मुजावरने प्रजासत्ताक दिनी रविवारी ४००१ लिंबू दांडपट्टयाने कापून अनोखा उपक्रम साजरा केला. दोन तासात चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करुन हे लिंबू कापून गफूरने उपस्थितांची टाळ्या अन शिट्यांनी दाद मिळविली.
शांतीदून मर्दानी खेळाच्या अखाड्याच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार पेठेतील विभागीय क्रीडा संकुलासमोर ४००१ लिंबू कापण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी १० वाजता गफूर रेहाना मुजावरने एकापाठोपाठ एक असे लिंबू दांडपट्टयाने कापायला सुरुवात केली. सोबतीला हलगी, घुमके, कैताळाचा दणदणाट व छत्रपती शिवरायांचा जयघोष असे स्फूर्तीदायी वातावरण होते. बघता बघता दोन तासातच या मावळ्याने तब्बल ४००१ लिंबू आपल्या दांडपट्टयाने कापले.
त्याला प्रोत्साहन देण्यासाठी शांतिदूत मदार्नी आखाड्याचे प्रशिक्षक अतुल शिंदे, सूरज केसरकर, हिंद मर्दानी खेळाचा आखाड्याचे श्रीकांत खोत, राजे प्रतिष्ठान मर्दानी खेळाच्या आखाड्याचे दिलीप जाधव, छावा मर्दानी खेळाच्या आखाड्याचे चंद्रकांत पोर्लेकर, शेखर जाधव, विद्या माने यांच्यासह खेळाडू व पालक उपस्थित होते.