लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून होणाºया पक्ष प्रवेशामुळे येथील स्थानिक भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत, तर जिल्ह्यातील पूर्व भागातील कॉँग्रेसची मोठी हानी होणार असल्याने कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही खळबळ उडाली आहे. सध्याच्या ग्रामीण परिसरातील होणाºया ग्रामपंचायती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदलाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात इचलकरंजीच्या कॉँग्रेस समितीचे संघटनात्मक कार्य वाखाणण्यासारखे असल्याने या समितीचा वेगळा दबदबा आहे. गेल्या साठ वर्षांहून अधिक काळात कॉँग्रेस समितीला अनेक दिग्गजांचे नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे इचलकरंजीतून दत्ताजीराव कदम व कल्लाप्पाण्णा आवाडे हे खासदार आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे हे आमदार म्हणून निवडले गेले. तसेच इचलकरंजी नगरपालिकेतही कॉँग्रेसचा सातत्याने दबदबा राहिला आहे.इचलकरंजीतील कदम आणि आवाडेंनी हातकणंगले व शिरोळ तालुक्यांत आपला वेगळा ठसा उमटविला आहे. येथील सरोजिनीताई खंजिरे या शिरोळच्या विधानसभा सदस्याही निवडल्या गेल्या आहेत. त्यामुळे या दोन्हीही तालुक्यांत कॉँग्रेसने आणि आता आवाडे यांना मानणाºया कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. इचलकरंजी नगरपालिकेत कॉँग्रेसचे १९ नगरसेवक आहेत. परिणामी, प्रकाश आवाडे यांच्या भाजपमधील संभाव्य प्रवेशाने कॉँग्रेस कार्यकर्त्यांत खळबळ उडाली आहे. आवाडेंना मानणाºया कार्यकर्त्यांमध्ये काहीसे उल्हासाचे वातावरण असले तरी कॉँग्रेसप्रेमींमध्ये मात्र नाराजी आहे.इकडे स्थानिक भाजप म्हणजे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या गोटात मात्र अस्वस्थता आहे. कारण हाळवणकर हे नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष असताना म्हणजे गेल्या वीस वर्षांपासून आवाडे विरोध म्हणून त्यांचे राजकारण चालत आहे. भाजपच्या उमेदवारीवर दोनवेळा आमदार झालेल्या हाळवणकरांना आवाडे हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. तर नगरपालिकेच्या निवडणुकांसह ग्रामीण भागातील निवडणुकांचे सामने आवाडे गट विरुद्ध हाळवणकर गट असेच लढले गेले आहेत. त्यामुळे कट्टर प्रतिस्पर्धी आवाडे भाजपमध्ये येत असल्याने हाळवणकर गटातही कमालीची अस्वस्थता आहे. कट्टर प्रतिस्पर्धी एकाच घरात कसे नांदणार, याचीच सर्वांना उत्सुकता आहे.
भाजपात अस्वस्थता, कॉँग्रेसमध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:32 AM