सेवा नव्हे, मेवा खाण्यासाठीच महाडिकांकडून गोकूळचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 10:51 AM2021-06-09T10:51:28+5:302021-06-09T10:54:52+5:30
GokulMilk Kolhapur : माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सेवेसाठी नव्हे, तर मेवा खाण्यासाठीच गोकूळचा वापर केल्याचा पलटवार गोकूळच्या संचालिका अंजना रेडेकर, प्रकाश पाटील व बयाजी शेळके यांनी मंगळवारी केला.
कोल्हापूर : माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सेवेसाठी नव्हे, तर मेवा खाण्यासाठीच गोकूळचा वापर केल्याचा पलटवार गोकूळच्या संचालिका अंजना रेडेकर, प्रकाश पाटील व बयाजी शेळके यांनी मंगळवारी केला.
गोकूळमध्ये चुकीचा कारभार केला असेल तर गुन्हे दाखल करा, असे आव्हान गोकूळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी दिले होते. त्यावर, रेडेकर, पाटील व शेळके यांनी पत्रकातून पलटवार केला.
पत्रकात म्हटले, महाडिक यांनी गेली ३० वर्षे कोट्यवधी रुपये टँकर भाडे, दूध एजन्सी यामधून मिळवल्याचा आरोप आमच्या नेत्यांनी केले. या आरोपांबाबत कोणीही व्यक्ती आपण जे केले ती चूक होती, आपण दूध उत्पादकांच्या तोंडचा घास काढून घेतला, याबाबत शरम वाटून शांत बसली असती; परंतु तसे घडले नाही. उलट आम्ही सेवा करून पैसे मिळविले, अशा आशयाचे पत्रक काढले. याबाबत आश्चर्य वाटते.
तुम्ही गोकूळ संस्थेचे प्रमुख सर्वेसर्वा असल्याने ४५ टँकर तुमचे होते. हे टँकर कार्यकर्त्यांना देऊन त्यांचे भले करता आले असते. इतर दूध संघांपेक्षा एका मुंबई खेपेला ७ हजार रुपये जादा भाडे तुम्ही घेतले. मुंबईची एजन्सी तुमचीच त्याचे कमिशन तुम्हालाच होते. दुधाची एजन्सी, बटर-लोणी याची विक्री तुम्हीच करत होता.
पहाटेपासून शेणामुतात राबणाऱ्या उत्पादकांच्या हातात दोन पैसे जादा देता आले असते. उलट आम्ही सेवा करून शेकडो कोटी रुपये बिल मिळविले असे म्हणता, यावरून तुमची व्यापारी प्रवृत्ती दिसते. कोणावर सूड उगवण्यासाठी आम्ही सत्तेवर आलेलो नाही, दूध उत्पादकांच्या घामाला योग्य भाव देण्यासाठी आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून, उत्पादकांच्या भल्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले तरी ते घेऊच, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
योग्य वेळी चौकशी आणि कारवाईही होईलच
तुमच्या कारभाराची योग्य वेळी चौकशी होईलच, कायद्याप्रमाणे चुकीच्या गोेष्टी झाल्या आहेत, त्यांच्यावर फौजदारीसह सर्व कारवाई होतीलच. ज्यांनी पाप केले, त्यांना प्रायश्चित्त घ्यावेच लागेल, असा इशाराही पत्रकातून दिला.
पंधरा कोटींची चर्चा
प्रत्येक पंधरा लाख रुपये घेऊन शंभर कर्मचाऱ्यांच्या भरतीचे १५ कोटी निवडणुकीसाठी गोळा केले. याची चर्चा जाहीरपणे लोक करत असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.