रस्ते सुरक्षेसंदर्भातील पुस्तक अपघात रोखण्यास उपयुक्त : धनंजय महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:37 AM2017-10-26T11:37:33+5:302017-10-26T11:44:02+5:30
वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेकांचे हकनाक बळी जात आहेत. हे अपघात कमी होण्यासाठी डॉ. पवार लिखित पुस्तक ‘रस्ते सुरक्षा ’ संबंधी पुस्तक उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी येथे केले.
कोल्हापूर : वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेकांचे हकनाक बळी जात आहेत. हे अपघात कमी होण्यासाठी डॉ. पवार लिखित पुस्तक ‘रस्ते सुरक्षा ’ संबंधी पुस्तक उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी येथे केले. प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार लिखित ‘प्रकाश वाटेकडे सुरक्षित प्रवास’ व ‘सतनाम संत कबीर ’ या पुस्तकांच्या वितरणप्रसंगी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
खासदार महाडिक म्हणाले,‘देशात रोज ४०० हून अधिकजण केवळ रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. रस्ते वाहतुकीचे नियम न पाळणे, वेगाने गाडी चालविणे, सीट बेल्ट न बांधणे, आदी कारणे आहेत. देशात लोकसंख्येबरोबरच दिवसेंदिवस वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र, नियमांचे पालन न केल्याने अनेक अपघात घडत आहेत. यासाठी कायदे कडक करणे आवश्यक आहे.
डॉ. पवार यांनी लिहिलेले हे पुस्तक रस्ते अपघात कमी होण्यासाठी निश्चितच उपयोगी आहे. त्याकरिता देशातील विविध भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित होणे गरजेचे आहे. याकरिता देशपातळीवर रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. या पुस्तकाबरोबरच सर्व शाळांमध्ये ते वितरण करण्याबरोबरच लघुपटही बनविला तर तो अधिक प्रभावी ठरेल. पुस्तकांसंबधी बोलताना डॉ. पवार म्हणाले, भौतिक ध्येय सुरक्षित ठेवण्यासाठी मोटरवाहन कायद्याचे पालन करणे बंधनकारक आहे. त्याला ‘वाहतूक शिक्षण’ची जोड दिली आहे.
महापौर हसिना फरास यांनी आजच्या युवा पिढीला हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. विधी व न्याय सेवा प्राधिकरणाचे सदस्य न्यायाधीश उमेशचंद्र मोरे म्हणाले, रस्ते अपघात कमी होण्यासाठी व वाहनधारकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल.
जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांना जिल्हा परिषदेतील शाळांकरिता दोन हजार पुस्तके वितरित करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. मोटार वाहन निरीक्षक पी. डी. सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी आभार मानले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह लॉरी आॅपरेटर्स असोसिएशन, रिक्षा, टॅक्सी, ड्रायव्हिंग स्कूल, आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
----
फोटो दीपक नंतर देत आहे .