कोल्हापूर : सत्ता भोगायची, भ्रष्टाचार करायचा आणि तो झाकण्यासाठी प्रसंगी बापाला बाजूला करून उडी मारायची, या प्रवृत्तीला विरोध करण्याबरोबरच कोल्हापूरच्या विकासाला गती देण्यासाठी राजकारणात सक्रिय झालो आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट) व्ही. बी. पाटील यांनी आपण ‘कोल्हापूर’मधून लोकसभा लढवणार असल्याची घोषणा केली.राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर दक्षिणची बैठक सोमवारी झाली. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष आर. के. पोवार हाेते. व्ही. बी. पाटील म्हणाले, भाजपचे चंद्रकांत पाटील पाच वर्षे मंत्री होते, त्यांनी कोल्हापूरचा काय विकास केला. त्यामुळेच पुण्याला जाऊन त्यांना विधानसभा लढवावी लागली. आता काही मंडळी त्यांच्या साेबत गेली असून, कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा असून, तो कधीही भाजपला स्वीकारणार नाही. दक्षिणचे अध्यक्ष नितीन पाटील म्हणाले, पक्षाध्यक्षांनी आदेश दिल्यानंतर रस्त्यावर लढायला आम्ही, मात्र सन्मान दुसऱ्याचा झाला. आता नव्याने दमाने पक्ष बांधणी करू. पीटर चौधरी, सुनीता कांबरे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी उपमहापौर सुनील मोहिते, सुनील देसाई, प्रणती कदम, मोतीलाल चव्हाण, पुष्पराज पाटील आदी उपस्थित होते.
राबायचे आम्ही; पदे कागलातराष्ट्रवादी पक्षात आम्ही राबायचे आणि पदे दुसऱ्यालाच, त्यांनी सत्तेची सगळी पदे कागलातच नेली. मला मार्केट कमिटीत पाठवले. पण, दोन महिन्यात घरी आलो. कानात सांगणाऱ्यांचे ऐकल्यानेच पक्ष वाढीस मर्यादा असल्याची टीका आर. के. पोवार यांनी केली.
जिल्हाध्यक्षांनी ‘राधानगरी’ सोडला नाहीपूर्वीच्या जिल्हाध्यक्षांनी राधानगरी तालुका सोडून कधीही दौरा केला नाही. घरात बसून नियुक्त्या केल्याने पक्षाची वाताहात झाली. मात्र, व्ही. बी. पाटील जिल्हा पिंजून काढत असल्याचे निरंजन कदम यांनी सांगितले.