भेडसगाव (ता. शाहूवाडी ) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेले १८ ते ४४ वयोगटातील कोविड प्रतिबंधक लसीकरण बुधवारपासून शासन आदेशानुसार थांबविण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या १२ दिवसात या केंद्रामध्ये १८ ते ४४ वयोगटातील सुमारे २१५३ नागरिकांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माळी यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात १ मेपासून पाच आरोग्य केंद्रांवरती १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील यांच्या पुढाकारातून शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र या एकमेव केंद्राचा समावेश करण्यात आला होता . शाहूवाडी तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यातीलही १८ ते ४४ वयोगटातील नागरिक लसीकरणासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर नौंदणी करून लस घेण्यासाठी या केंद्रावरती येत होते. त्यामुळे हे लसीकरण सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरणासाठी या केंद्रावरती मोठी गर्दी होत होती. १ मे ते १२ मे या कालावधीमध्ये या केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील सुमारे २१५३ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा दिली .
दरम्यान, शासनाने मंगळवारी उपलब्ध लसीचा साठा ४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यास प्राधान्य देत १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबविण्याचा निर्णय घेतल्याने प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेले भेडसगाव केंद्रावरील लसीकरणही बुधवारपासून थांबविण्यात आले आहे. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासंदर्भात पुढील शासन आदेश येईपर्यंत हे लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माळी यांनी दिली.