निवडणुकीत टीका; सत्तेसाठी मिठ्या

By Admin | Published: March 23, 2017 12:25 AM2017-03-23T00:25:23+5:302017-03-23T00:25:23+5:30

जिल्हा परिषद : तत्त्वांना तिलांजली; पाण्यात बघणाऱ्यांचे गळ्यात गळे

Vaccination in elections; Salt to the power | निवडणुकीत टीका; सत्तेसाठी मिठ्या

निवडणुकीत टीका; सत्तेसाठी मिठ्या

googlenewsNext

राजाराम लोंढे -- कोल्हापूर पंधरा दिवसांपूर्वी टोकाची ईर्ष्या करीत एकमेकांचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा विडा उचललेल्या नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीत मात्र एकमेकांच्या गळ्यात गळे घालत ‘सत्तेसाठी आम्ही कायपण करू’ हेच पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. प्रत्येक निवडणुकीत स्थानिक पातळीवर नेत्यांसह कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लागतेच; पण ही जिल्हा परिषदेची निवडणूक वेगळ्या वातावरणात झाली. पहिल्यांदाच भाजपने दोन्ही कॉँग्रेससमोर तगडे आव्हान निर्माण केलेच; पण मित्रपक्ष शिवसेना नेत्यांचीही भंबेरी उसळली. शाहूवाडी तालुक्यात भाजप-जनसुराज्य आघाडीविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी, पन्हाळ्यात जनसुराज्यविरोधात सर्वपक्षीय, हातकणंगलेत जनसुराज्य-भाजपविरोधात आघाड्या, शिरोळमध्ये भाजपविरोधात स्वाभिमानी, गडहिंग्लज व चंदगडमध्ये स्थानिक आघाड्या एकमेकांविरोधात, राधानगरी-भुदरगडमध्ये कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकमेकांविरोधात उभ्या होत्या. या निवडणुकीत प्रचाराची राळ उडाली. प्रचारादरम्यान नेत्यांनी एकमेकांचे शाब्दिक वस्त्रहरण करून आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. भाजप-जनसुराज्यची आघाडी झाली; पण शिरोली मतदारसंघात विनय कोरे यांनी शौमिका महाडिक यांना कडवा विरोध केला. आमदार सुजित मिणचेकर यांनी तर या मतदारसंघात महाडिकविरोधात प्रचाराचे रान उठविले होते. महाडिक यांना घरी बसविण्याची भाषा करणारे मिणचेकर शौमिका महाडिक यांना सत्तेच्या खुर्चीवर बसविण्यात पुढे राहिले. विधान परिषदेच्या निवडणुकीत शब्द देऊनही प्रकाश आवाडे यांनी ऐनवेळी दगा दिल्याने महादेवराव महाडिक यांनी इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीत आवाडे यांची सत्ता घालविली. आमदार सुरेश हाळवणकर व प्रकाश आवाडे पारंपरिक विरोधक, हे सगळे एकत्रित आले. गडहिंग्लज-चंदगडच्या राजकारणात जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील व डॉ. नंदा बाभूळकर हे एकमेकांचे विरोधक, तर शिरोळमध्ये बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपने खासदार राजू शेट्टी यांना रोखले. के. पी. पाटील व आमदार प्रकाश हे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत एकत्र आले. सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेमुळे भाजपवर जहरी टीका करणारे खासदार राजू शेट्टीही पुन्हा भाजपसोबत गेले. एकंदरीत जि.प.च्या रणांगणात झालेले आरोप-प्रत्यारोप, त्यानंतर सत्तेसाठी नेत्यांनी मारलेल्या मिठ्या पाहून सामान्य माणूसही अचंबित झाला आहे.


नरके यांनी ‘टायमिंग’ साधली
राहुल पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करीत जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याचे दोन्ही कॉँग्रेसच्या मनसुब्यांना सुरुंग लावण्यात आमदार चंद्रदीप नरके यांची भूमिका निर्णायक ठरली. शिवसेनेची भूमिका तळ्यात-मळ्यात असताना मोठे धाडस करून भाजपशी केलेली तडजोड व राजकीय मुत्सद्देगिरी दाखवीत आमदार नरके यांनी अचूक टायमिंग साधत टाकलेले पत्ते यशस्वी ठरले.

माने यांची नम्रता व निष्ठा
अध्यक्षपदासाठी गोळाबेरीज न झाल्याने शेवटच्या क्षणी ज्येष्ठ सदस्य बंडा माने यांचे नाव नेत्यांनी पुढे केले. पराभव माहीत असताना कॉँग्रेस पक्षावरील निष्ठेपोटी नेत्यांनी टाकलेली जबाबदारी त्यांनी हसतमुखाने स्वीकारली. एवढेच नव्हे तर शौमिका महाडिक विजयी झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ते सर्वांत पुढे होते.

Web Title: Vaccination in elections; Salt to the power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.