कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रात आज, सोमवारपासून कोविशिल्डच्या फक्त दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. महापालिकेस कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी शासनाकडून ८ हजार लस साठा मिळाला आहे. त्यामुळे पहिल्या डोससाठी नागरिकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडील लस संपल्यामुळे सर्व केंद्रे दोन दिवस बंद ठेवली होती. नागरिक या दोन दिवसात केंद्रावर जाऊन चौकशी करत होते. लस आलेली नाही असे कळले की घरी परतत होते. परंतु रविवारी ८ हजार डोस आले आहेत. त्यामुळे थांबलेली लसीकरण मोहीम सुरू होईल.
महापालिका उद्यापासून सर्व केंद्रावर कोविशिल्ड लसीकरणाचा दुसरा डोस देणार आहे. महापालिका क्षेत्रात दि. ५ मार्च ते दि. १६ मार्च अखेर कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेले एकूण १२ हजार ९३५ लाभार्थी आहेत. दि. १५ एप्रिल ते २४ एप्रिल २०२१ अखेर कोविशिल्डचा दुसरा डोस घेतलेले ३,९०० लाभार्थी आहेत.
महानगरपालिकेस रविवारी मिळालेल्या लसीकरणानुसार कोविशिल्डचा पहिला डोस ज्या नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतला आहे व दि. २६ एप्रिल रोजी ज्यांना सहा आठवडे पूर्ण झाले आहेत, अशा पात्र लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेण्याकरिता संबंधित प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात जावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
ज्या लाभार्थ्यांनी पहिल्या डोसच्या लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर ऑनलाईन रजिस्टेशन केले आहे. फक्त त्यांनीच प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडे लसीकरणासाठी यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.