कोल्हापूर : प्रायोगिक तत्वावर सुरु झालेल्या १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाच्या शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी तरुणांनी रांगा लावून लसीकरण करुन घेतले. जिल्ह्यात निश्चित केलेल्या पाच केंद्रांवर पुढील सात दिवस हे लसीकरण सुरु राहणार आहे. कोविन ॲपवर नाेंदणी केलेल्यांनाच लस दिली जात आहे. दरम्यान, रविवारीही लसीकरणासाठीच्या रांगा कायम होत्या.
नियमित लसीकरणाबरोबरच तिसऱ्या टप्प्यांतर्गत प्रत्येक केंद्रावर २०० याप्रमाणे पुढील सात दिवस पाच केंद्रांवर तरुणांची लसीकरण प्रक्रिया सुरु राहणार आहे. लस उपलब्ध होईल, त्याप्रमाणे केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे. जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील तरुणांची संख्या ११ लाखावर आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त शनिवारी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा झाली. यावेळी शुभारंभानंतर लगेचच दुपारपासून तरुणांनी केंद्रावर गर्दी करत लस टोचून घेण्यास सुरुवात केली. लसींची उपलब्धता कमी असल्याने आरोग्य विभागाने केवळ पाच केंद्रांची निवड केली आहे. यात भगवान महावीर दवाखाना विक्रमनगर, शिरोळ ग्रामीण रुग्णालय, भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीनगर वसाहत रुग्णालय, कागल ग्रामीण रुग्णालय यांचा समावेश आहे.