कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत शनिवारी दिवसभर कोविड लसीकरण करण्यात आले. यामध्ये व्यापारी, अडते, हमाल, तोलाईदार व समिती कर्मचाऱ्यांनी लस घेतली. महापालिकेच्या सहकार्याने समिती प्रशासनाने एकच दिवस येथे लसीकरणाचे आयोजन केले हाेते.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्य सरकारने निर्बंध आणले असले तरी जीवनावश्यक वस्तू म्हणून बाजार समित्यांचे कामकाज सुरू आहे. येथे रोज भाजीपाला, फळे, कांदा-बटाट्याचे सौदे होतात. सौद्यात शेतकरी, खरेदीदार, अडते, हमाल, तोलाईदार व बाजार समितीचे कर्मचारी सहभागी होतात. त्यातून संसर्ग वाढण्याची धोका अधिक असतो. यासाठी संबंधित घटकांना लसीकरण करण्याची मागणी बाजार समितीने महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार शनिवारी महापालिकेच्या साहाय्याने बाजार समिती प्रशासनाने लसीकरण केले. सकाळी साडेनऊ वाजता बाजार समिती अशासकीय मंडळाचे सदस्य सूर्यकांत पाटील व सचिव जयवंत पाटील यांच्या उपस्थित लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. दिवसभरात साडेतीनशे जणांनी लस घेतली. यामध्ये व्यापारी, अडते, हमाल, तोलाईदार व समिती कर्मचाऱ्यांचा समावेश होता.