कोल्हापूर : वीरशैव हा सनातन धर्म तर लिंगायत ही आचरणपद्धती त्याचे पर्यायीवाचक नाव आहे. हा धर्म वेदागमाला अनुसरून असल्याने त्याला हिंदू धर्मापासून वेगळे करता येणार नाही. त्यामुळे मोर्चाद्वारे वीरशैव-लिंगायत समाजाला ‘स्वतंत्र धर्म’ घोषित करण्याची मागणी चुकीची आहे. त्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन जातीनिहाय आर्थिक दुर्बल घटकांना सोयी-सुविधा कशा मिळतील यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले, जाती धर्मात तेढ वाढवून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणे उचित नाही. वीरशैव हा धर्म असून, त्यात गुरू-शिष्याला इष्टलिंग दीक्षा देतात, तेव्हा तू लिंगाधीन होऊन आपले जीवन व्यतित कर, असा उपदेश करतात. या आचरणपद्धतीचा अपभ्रंश होऊन ‘लिंगायत’ शब्दाची निर्मिती झाली आहे. त्यामुळेत्याला ‘स्वतंत्र धर्म’ म्हणता येत नाही. महात्मा बसवेश्वरांनीसुद्धा वीरशैव दीक्षा घेतली व त्याचा प्रचार केला. त्यांच्या कोणत्याच वचनात ‘लिंगायत’ शब्दाचा उल्लेख नसल्याने त्यांना ‘लिंगायत धर्माचे संस्थापक’ म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही.
आपल्या देशात जातीवर आधारित राखीव व्यवस्था चालत आली असून, वीरशैव लिंगायतमध्ये उपजीविकेसाठी केलेल्या उद्योगामुळे अनेक जाती निर्माण झाल्या. त्यातील काही जातींना आरक्षण मिळाले. ज्या पोटजातींना काहीही मिळाले नाही त्यांच्यासाठी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे. एका धर्मात फूट पाडून परस्पर संघर्ष केला तर काही लाभ होणार नाही. याशिवाय ‘अल्पसंख्याक’ म्हणून सुविधा घेतली तर या धर्मातील विविध जातींना मिळणाºया आरक्षणाच्या सवलती बंद होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ‘वीरशैव वेगळा व लिंगायत वेगळा’ अशी फूट न पाडता संघटितपणे राज्य सरकार व केंद्र सरकारकडे सर्व पोटजातींना सवलत मिळण्यासाठी सर्वांनी एकजूट होणे ही काळाची गरज आहे.
अक्कमहादेवी मंडप येथे झालेल्या पत्रकार परिषदेनंतर झालेल्या धर्मसभेत त्यांनीआशीर्वचन दिले. यावेळी शिवलिंग शिवाचार्य बेळंकीकर महाराज, शिवयोजी शिवाचार्य म्हैशाळकर महाराज, शिवानंद शिवाचार्य वाळवेकर महाराज, चंद्रशेखर शिवाचार्य मासोलीकर महाराज, महादेव महाराज हिंगणगावकर,श्रीधर पैलवान, आदी मान्यवर उपस्थित होते.