कोल्हापूर : जीवनावश्यक वस्तू आणण्याच्या नावाखाली नागरिकांची बाजारपेठेत होत असलेली गर्दी पाहता महानगरपालिका प्रशासनाने बाजारपेठेतील दुकाने, शहरातील सर्व भाजीमंडई गुरुवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्याऐवजी जीवनावश्यक सर्व वस्तू नागरिकांना घरपोच देण्याची व्यवस्था दुकानदार, भाजी विक्रेत्यांना करावी लागणार आहे.
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिक जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्याच्या नावाखाली घराबाहेर पडतात. महापालिकेने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर वेळोवेळी दंडात्मक कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करणारी दुकानेही सील केली. अशा अनावश्यक गर्दीमुळे शहरात रुग्णांची संख्या वाढू नये, त्याचबरोबर कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून भाजीपाला, फळे, किराणा माल, दूध इत्यादी जीवनावश्यक साहित्य नागरिकांपर्यंत घरपोच कसे देता येईल यावर नोडल अधिकाऱ्यांची स्थायी समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.
नागरिकांना जीवनावश्यक साहित्य त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे. नोडल अधिकाऱ्यांनी सर्व मार्केटमधील भाजी विक्रेत्यांशी चर्चा करून घरपोच भाजी विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व भाजी विक्रेत्यांनी गाडीद्वारे भाजी विक्री करण्यास सहमती दर्शविली आहे. महापालिका ॲपद्वारे प्रभागातील भाजी, फळे, किराणा स्टोअर्स, मेडिकल स्टोअर्स यांचे नंबर्स जाहीर करणार आहे. नागरिकांना याचा वापर करून घरी राहून घराजवळील दुकानातून साहित्य मागविता येईल.
नागरिकांनी रस्त्यावर अनावश्यक गर्दी न करता घरी राहून या सेवेचा लाभ घ्यावा. स्वत:ला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे अवाहन प्रशासक बलकवडे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक दुकाने सोडून नियमांचे उल्लंघन करणारी दुकाने सील करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शिल्पा दरेकर, सहा. आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, उपशहर अभियंता नारायण भोसले, हर्षजित घाटगे, एन.एस. पाटील, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधीक्षक राम काटकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, अतिक्रमण निर्मूलन प्रमुख पंडित पोवार उपस्थित होते.