कागलचे कुलगुरू आणि बावड्याचे कुलपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:18 AM2021-05-03T04:18:17+5:302021-05-03T04:18:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कागलचे कुलगुरू कोठे आहेत? असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी विचारल्यानंतर ते कुलपतींना माहिती असा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कागलचे कुलगुरू कोठे आहेत? असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी विचारल्यानंतर ते कुलपतींना माहिती असा टोला माजी आ. संजय घाटगे यांनी लगावला. यावर, पालकमंत्री कुलपतींच्या विजयाची घोषणाच घाटगे यांनी दिली. करवीरच्या विवेकानंद महाविद्यालयातील केंद्रावर दोन्ही नेत्यांमध्ये टोलेबाजी चांगलीच रंगली.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत टोकाचे आरोप- प्रत्यारोप झाल्याने टोकाचा संघर्ष पाहावयास मिळाला. मात्र, मतदान केंद्रावर राजकीय टोलेबाजींने वातावरण काहीसे हलके फुलके होण्यास मदत झाली. विरोधी आघाडीचे ठरावधारक एकत्रित येत असतानाच संजय घाटगे हे तिथे आले. पालकमंत्री पाटील हे विरोधी आघाडीच्या उमेदवारांसमवेत तर घाटगे हे सत्तारूढ गटाच्या उमेदवारांसमवेत उभे होते. ‘कागल’चे कुलगुरू कोठे आहेत? असे पाटील यांनी विचारल्यानंतर ते कुलपतींनाच माहिती असे घाटगे म्हटल्यानंतर एकच हशा पिकला. यावर ‘कुलपती मंत्री साहेब विजयी असो’, अशी घोषणा घाटगे यांनी दिल्या.
समीकरणे बदलतात, सॅनिटायझर द्या
मंत्री सतेज पाटील हे हाताला सॅनिटायझर लावत असताना, आमच्या हातावर जरा ओता, असे संजय घाटगे म्हणाले, यावर ‘बाबांना’ द्या समीकरणे असेच राहणार नाहीत, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
तुम्ही म्हाताऱ्याला एकटे टाकले
विश्वास पाटील हे सकाळी सातपासूनच मतदान केंद्रावर होते, तर सत्तारूढ गटाचे बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील, रणजित पाटील हे समोर उभे होते. तुमच्यातील आणखी एक कोठे आहे? असे विश्वास पाटील यांनी विचारले. त्यावर तुम्ही आमचेच असल्याचे उदय पाटील यांनी सांगितले. आम्ही भ्रष्टाचारी आहोत, तुम्हाला चालत नाही, म्हणूनच तुम्ही म्हाताऱ्याला एकटे टाकल्याचा पलटवार विश्वास पाटील यांनी केला.
‘बाळासाहेब’ ठराव पण बारा वाजताच येणार का?
विरोधी आघाडीच्या ठरावधारकांचे अकरा वाजताच मतदान पूर्ण झाले. बारा वाजत आले तरी सत्तारूढ गटाचे ठराव आले नसल्याने, बाळासाहेब (खाडे) ठराव पण बारा वाजताच येणार का? असा टोला मंत्री पाटील यांनी मारला.
सरूडकरांची आदराने विचारपूस
रखरखत्या उन्हात माजी आ. बाबासाहेब पाटील-सरूडकर व अनुराधान पाटील हे मतदान केंद्रावर आले होते. ते दुसऱ्या बाजूला उभे असल्याचे पाहून मंत्री पाटील, चंद्रदीप नरके व ऋतुराज पाटील यांनी तिथे जाऊन नमस्कार करून आदराने विचारपूस केली.
विरोधी नेत्यांची नजर पडू नये म्हणून तट उभा
सत्तारूढ गटाचे ठरावधारक आल्यानंतर मंत्री पाटील हे ‘नमस्कार वहिनी बंटी पाटील’, असे हात जोडत होते. त्यामुळे सत्तारूढ गटाचे प्रताप पाटील-कावणेकर यांच्यासह समर्थक त्यांच्या आडवे उभे राहिले. यावर ‘प्रताप आडवे कशाला उभे राहता’ असे मंत्री पाटील यांनी सांगितले.