मसाई पठार संवर्धन क्षेत्रात समावेश नको, तेरा गावांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 02:50 PM2020-12-29T14:50:54+5:302020-12-29T14:54:31+5:30
ForestDepartment- मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्रात आमच्या गावांचा समावेश करू नये अशी मागणी शाहूवाडी तालुक्यातील १३ गावांनी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांच्याकडे केली आहे. बोरगे यांनी तातडीने याबाबत मुख्य वनसंरक्षक यांना पत्र लिहिले आहे.
कोल्हापूर : मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्रात आमच्या गावांचा समावेश करू नये अशी मागणी शाहूवाडी तालुक्यातील १३ गावांनी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांच्याकडे केली आहे. बोरगे यांनी तातडीने याबाबत मुख्य वनसंरक्षक यांना पत्र लिहिले आहे.
पन्हाळा तालुक्यातील मसाई पठार परिसरात जैवविविधता आहे. तसेच बांदिवडे गावाजवळ दुर्मीळ अश्नीस्तंभ आढळतात. याच तालुक्यात ऐतिहासिक पांडव लेणी आहेत. त्यामुळे हा परिसर संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्याची प्रक्रिया वन विभागाकडून सुरू आहे. बांदिवडे, बांदेवाडी, इंजोळे, पणुंदे, शिराळे तर्फ मलकापूर, आंबार्डे सावर्डे बु., वरेवाडी, परखंदळे, खोतवाडी, परळी, घुंगुर, सोनुर्ले, येळेवाडी या गावांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.
अशा पध्दतीने संवर्धन राखीव क्षेत्रात या गावांचा समावेश झाल्यास या गावांवर अनेक निर्बंध येणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या राखीव क्षेत्रामध्ये गावांचा समावेश करण्यास या गावांनी विरोध केला आहे. मसाई पठार परिसर संरक्षित करण्यास आमची काही हरकत नाही. मात्र, या गावांचा राखीवमध्ये समावेश करून आमच्यावर बंधने आणून विकासाला बाधा नको असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या सर्वांनी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर बोरगे यांनी तसे लेखी पत्र वनविभागाला दिले आहे.
या गावांच्या राखीव क्षेत्रातील समावेशावरून संभ्रम निर्माण झाला आहे. गावांच्या विकासावरही मर्यादा येणार आहेत. त्यामुळे या गावांचा समावेश करू नये यासाठी वेळ पडल्यास आम्ही उग्र आंदोलन छेडणार आहोत.
-विजय बोरगे,
जिल्हा परिषद सदस्य