कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण दूध वाहनांची तोडफोड; संकलनावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:19 AM2018-07-18T01:19:22+5:302018-07-18T01:19:56+5:30
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध संकलन बंदला दुसऱ्या दिवशी हिंसक वळण लागले. दूध वाहतूक करणाºया सात वाहनांवर दगडफेक करण्यात आली. अनेक ठिकाणी वाहने आडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतण्यात आले किंवा त्याचे वाटप करण्यात आले. रात्री पावणेबाराच्या सुमारास दानोळीजवळ दुधाचा एक टॅँकर पेटविण्यात आला. यामुळे दूध संघांच्या दूध संकलनावर परिणाम झाला. अनेक गावांत शेतकºयांनी स्वयंस्फूर्तीने संकलन बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.सर्वाधिक दूध संकलन असणाºया ‘गोकुळ’चे पाच लाख तर ‘वारणा’ संघाचे अडीच लाख लिटर संकलन होऊ शकलेले नाही. पोलीस बंदोबस्तात ‘गोकुळ’चे ३५ हून अधिक दुधाचे टॅँकर मुंबईकडे रवाना झाले आहेत. दोन दिवस संकलनावर परिणाम झाला असला तरी शहरात दुधाची टंचाई फारशी जाणवत नाही.
गाय दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी सोमवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध संकलन बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला सोमवारी जिल्ह्णातील सर्वच दूध संघांनी संकलन बंद ठेवून पाठिंबा दिला होता; त्यामुळे फारसा तणाव निर्माण झाला नाही. मंगळवारपासून ‘गोकुळ’सह बुहतांशी संघांनी संकलन सुरू केले.
‘गोकुळ’ ने पहाटे साडेपाच वाजल्यापासून प्राथमिक दूध संस्थांत संकलन करून बहुतांशी दुधाचे टेम्पोे सकाळी आठपर्यंत दूध प्रकल्पावर आणले. सकाळी साडेपाच लाख लिटर दूध संकलन होते, पण मंगळवारी ३ लाख २३ हजार लिटर संकलन झाले. सायंकाळी पाच लाख लिटर संकलनापैकी केवळ अडीच लाख लिटरच होऊ शकले.
‘वारणा’ दूध संघाचे रोजचे साडे तीन लाख लिटर संकलन आहे, मंगळवारी सकाळी ७५ हजार लिटर तर सायंकाळी ६० हजार लिटर संकलन होऊ शकले. करवीर, कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यातील अनेक संस्थांनी स्वत:हून संकलन बंद ठेवले. गगनबावडा तालुक्याला पुराच्या पाण्याने वेडा दिल्याने वाहतूकच ठप्प झाली आहे. रविवारी रात्रीपासून दुधाची वाहतूक करणाºया वाहनांचे तोडफोडीचे सत्र मंगळवारीही कायम राहिले. शिरोळ, निढोरी, मुडशिंगी, कोगनोळी येथे तोडफोड करण्यात आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. ‘गोकुळ’ ने मंगळवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात दुधाचे १५ तर सायंकाळी १८ टॅँकर मुंबईकडे रवाना झाले. दुपारी तीन वाजता कर्नाटकातील ‘नंदिनी’ दूध संघाच्या चार टॅँकरची वाहतूकही मुंबईकडे झाली.
टॅँकर, टेम्पोची अडवणूक
दूध बंद आंदोलनाच्या दुसºया दिवशी स्वाभिमानी कार्यकर्ते आक्रमक झाले. उदगाव येथे सात वाहनांवर दगडफेक करण्यात आली. तर धामोड, इचनाळ, गोगवे, बांववडे येथे दुधाचे टेम्पो अडवून त्यातील दूध रस्त्यावर फेकण्यात आले. अंबप येथे रात्री दूध वितरणासाठी आलेला टेम्पो फोडण्यात आला. या पार्श्वभूमीवर संकलन केंद्रे, दूध संघाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. ग्रामीण भागात आंदोलनाला पाठिंबा मिळत असून, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दूध संकलन बंद आहे.
लिटरला ३ रुपये दरवाढ देण्याचा विचार
कोल्हापूर : स्वाभिमानीच्या दूध बंद आंदोलनाचा धसका राज्य शासनाने मंगळवारी चांगलाच घेतला. राज्यात झालेल्या दूधकोंडीतून तोडगा म्हणून लिटरला तीन रुपये दरवाढ देण्याचा विचार शासन करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. -वृत्त/४
‘स्वाभिमानी’ ने रणनीती बदलली?
स्वाभिमानीच्या आंदोलनाला सरकारने बेदखल केले, त्यातच ‘गोकुळ’, ‘वारणा’ दूध संघांनी संकलन सुरू केल्याने कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत. पोलीस बंदोबस्तात दूध वाहतूक सुरू करून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे; त्यामुळे आजपासून कार्यकर्ते अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शेतकरी जनावरांसह महामार्गावर येण्याच्या तयारीत आहेत.
पुराच्या पाण्याचाही परिणाम
दूध बंद आंदोलनामुळे दुधाची वाहतूक होऊ शकली नसली तरी पुराच्या पाण्याचाही फटका बसला आहे. जिल्ह्णाच्या पश्चिमेकडील तालुक्यात नद्यांना पूर आल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत; त्यामुळे दुधाची वाहतूक होऊ शकली नाही.
‘गोकुळ’ दूध वाहतुकीचे केंद्र
कर्नाटकातील दूध संघांसह खासगी संघांचे टॅँकर ‘गोकुळ’ मध्ये एकत्रित करून तेथून पोलीस बंदोबस्तात मुंबईकडे पाठविले जातात. विशेष म्हणजे रात्री ऐवजी आता दिवसाच टॅँकरची वाहतूक केली जात आहे.
शिरोळमध्ये शंभर टक्के बंद
स्वाभिमानीचा प्रभाव क्षेत्र असलेल्या शिरोळ तालुक्यात संकलन होऊ शकले नाही.
शेतकºयांनी स्वयंस्फूर्तीने संकलन बंद ठेवून आंदोलनाला दुसºया दिवशीही पाठिंबा दिला.
दूध वाहतुकीसाठी शासनाचा दबाव
मुंबईतील दूध रोखून सरकारची नाकेबंदी करण्याची व्यूहरचना ‘स्वाभिमानी’ची आहे; पण सरकारनेही कोणत्याही परिस्थितीत दूध वाहतूक झाली पाहिजे, यासाठी दूध संघांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.