कोल्हापूर : कोल्हापूर पब्लिक स्कूलमधील प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी हे आमच्या कुटुंबातील घटक आहेत. कौटुंबिक नात्याने त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आमची आहे. क्रीडाशिक्षक विजय मनुगडे याने केलेला प्रकार घृणास्पद आहे. त्याला कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही सर्व यंत्रणेला लागेल ती मदत करीत आहेत. तसेच शाळेमध्ये ‘विशाखा समिती’ची स्थापना केली आहे, अशी माहिती आर. एल. फाउंडेशनच्या शोभा तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजेंद्रनगर येथील कोल्हापूर पब्लिक स्कूलमधील क्रीडाशिक्षक विजय मनुगडे याने चार मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली. याबाबत शाळेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी गुरुवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
तावडे म्हणाल्या, घडलेल्या प्रकारानंतर स्कूलने क्रीडाशिक्षक विजय मनुगडे याची कायदेशीर बडतर्फी करण्याचे काम सुरू आहे. तपासाबाबत पोलिसांना संस्थेकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जात आहे.
विशाखा समितीच्या अध्यक्षा डॉ. आर. पद्मिनी या असणार आहेत. त्याशिवाय सरोजिनी पाटील, डॉ. वासंती रासम, डॉ. साधना झाडबुक्के यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
या सर्वांची माहिती तसेच फोन नंबर शाळेच्या प्रवेशद्वारासमोर लावण्यात येणार आहेत. शाळेमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. यासह शाळेमध्ये महिला क्रीडाशिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. यावेळी मुख्याध्यापिका शुभांगी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.