विद्यार्थ्यांची समीक्षाच्या भावंडांना दिवाळी भेट
By admin | Published: November 4, 2015 11:31 PM2015-11-04T23:31:45+5:302015-11-04T23:31:45+5:30
काही रक्कम उपचारांसाठी : शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची मदत; सामाजिक उत्तरदायित्व जपले
कोल्हापूर : पालकांनी दिवाळीत फटाके उडविण्यासाठी दिलेल्या पैशातून शिवाजी मराठा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाजून जखमी झालेल्या समीक्षा कांबळे हिच्या भावंडांसाठी नवे कपडे आणि बूट भेट देऊन सामाजिक उत्तरदायित्व जपले. विद्यार्थ्यांना कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्यामुळे प्रेरणा मिळाली.
दुर्गामाता दर्शनासाठी मंडळाच्या मंडपात गेलेल्या समीक्षा कांबळे या आठ वर्षांच्या चिमुरडीचा फ्रॉक समईवर पडल्याने ती २२ आॅक्टोबरला गंभीररीत्या भाजली आहे. समीक्षाची आई धुणी-भांडी करते, तर वडील टिंबर मार्केटमध्ये मोलमजुरी करतात. सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिची यंदाची दिवाळी रुग्णालयातच जाणार आहे. त्यामुळे समीक्षाच्या बहिणीला, भावाला दिवाळीचा आनंद लुटता येणार नाही. त्यामुळे शिवाजी मराठा विद्यालयातील दहावीतील साखरुन्निसा खान, लक्ष्मी कामण्णा, श्रीनाथ काजवे, राहुल कांबळे, नीलेश झेंडे, अश्विनी मुक्त, यशराज कदम, मंगेश कांबळे या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संपर्क साधत पालकांनी दिवाळीत फटाके उडविण्यासाठी दिलेल्या पैशातून ४५00 रुपये
जमा केले. त्यातून मंगळवारी दुपारी याच शाळेत शिकणारी समीक्षाची बहीण सेजल आणि भाऊ साहिल यांना कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्या उपस्थितीत दीपावली भेट म्हणून नवे कपडे आणि बूट घेऊन दिले.
या छोट्याशा प्रयत्नाने समीक्षाच्या भावंडांच्या चेहऱ्यावर
हासू आणले आहे. कपडे घेऊनही उरलेली १६५0 रुपयांची रक्कम समीक्षाच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मिलिंद यादव यांच्याकडे दिली आहे.
फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा
मिलिंद यादव गेल्या चार वर्षांपासून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी मोहीम चालवितात. विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना फटाक्यांपासून होणारे दुष्परिणाम आणि तोटे ते समजावून सांगत आले आहेत. शिवाजी मराठा हायस्कूलचे विद्यार्थी आम्ही फटाके वाजविणार नाही, या पैशातून गरिबाला मदत देऊ, अशी प्रतिज्ञा घेतात. यंदाही दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मोहिमेला पाठबळ दिले आहे.
‘चिल्लर पार्टी’ची समीक्षाला मदत
मिलिंद यादव यांनीच सुरू केलेल्या ‘चिल्लर पार्टी’ या बालचित्रपटाच्या प्रदर्शनावेळी समीक्षाला मदतीचा हात देण्याचे आवाहन बालप्रेक्षकांना केले होते. त्यावेळी १५00 रुपये जमा झाले होते.