वडगाव पालिका घरोघरी देणार कचराकुंड्या

By admin | Published: December 9, 2015 09:28 PM2015-12-09T21:28:22+5:302015-12-10T01:03:55+5:30

महिन्यात अंमलबजावणी : सहा हजार घरांना देणार प्रत्येकी दोन कुंड्या, लोकसहभागातून कुंड्या संकलनाचे नियोजन

Wadgaon municipality will give door to Kachra Kundya | वडगाव पालिका घरोघरी देणार कचराकुंड्या

वडगाव पालिका घरोघरी देणार कचराकुंड्या

Next

सुहास जाधव- पेठवडगाव --‘स्वच्छ भारत’ आवाहनास प्रतिसाद देत व शहरातून दररोज निघणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वडगाव पालिकेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. पालिकेने पुढाकार घेत लोकसहभागातून कचराकुंड्या मिळाव्यात, याचे नियोजन केले आहे. शहरातील सुमारे सहा हजार घरांना प्रत्येकी दोन कचराकुंड्या पुरविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या कचराकुंड्यांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला जाईल, तसेच पालिकेच्या घंटागाड्यांद्वारे कचरा संकलन केले जाणार आहे.जिल्ह्यासह राज्यातील या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर राबविण्यात येणार आहे. पालिकेने एक दिवसा आड घंटागाडीद्वारे घरातून कचरा संकलन अभियान यशस्वीपणे राबविले आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून नागरिकांत कचराकुंड्या देण्यासाठी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.सध्या शहरात तीन घंडागाड्या व उर्वरित शहरातील कचरा दोन ट्रॅक्टरमधून संकलित करण्यात येतो. हा कचरा ओला व सुका एकत्रित असतो. हा कचरा डेपोत संकलित केला जातो. या पार्श्वभूमीवर शहरातील ओला कचरा थेट घरातून वेगळा करून संकलित करण्याचे पालिकेने नियोजन केले आहे. या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट, गांडूळ खत प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरात प्रत्यक्षात सुमारे सात हजार मिळकतधारक आहेत. यात रहिवासी विभागातील सहा हजार घरे आहेत. यातील प्रत्येक घरात कचराकुंड्या वितरित केल्या जाणार आहेत. दोन वेगवेगळ्या पद्धतीने नागरिक त्यांचे संकलन करणार आहेत. तशी सुविधा कचरा उचलणाऱ्या अ‍ॅपे रिक्षा (घंटागाडी) वाहनामध्ये करण्यात येणार आहे.लोकसहभागातून कचराकुंड्या मिळाव्यात, यासाठी पालिका प्रशासनाने चाचपणी केली आहे. त्यास शहरातील काही बॅँकांनी तत्काळ प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत सहा हजार कचराकुंड्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


उत्पन्नात भर पडण्यासाठी खताचे नियोजन
स्वच्छतेच्यादृष्टीने कचरा उठाव यशस्वी झालेले आहे. पालिकेच्या उत्पन्नात भर पडावी, यासाठी ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट, गांडूळ खताचे नियोजन पालिकेने केलेले आहे. तरी नागरिक, बॅँका, पतसंस्था, विविध संस्था, सामाजिक संस्था, तरुण मंडळे व दानशूर व्यक्तींनी लोकसहभागातून कचराकुंडी दान उपक्रमास सहकार्य करावे. पाच लिटरच्या कुंड्या देण्याचे नियोजन केले असून, कुंड्या दान करण्यासाठी पालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी नागेंद्र मुत्तेकर यांनी केले आहे.

Web Title: Wadgaon municipality will give door to Kachra Kundya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.