वहिफणी कामगाराचा लाथाबुक्क्यांनी मारून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 10:32 AM2021-03-17T10:32:23+5:302021-03-17T10:34:41+5:30
Crime News Police Kolhapur- खोतवाडी (ता.हातकणंगले) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीसमोर सायकल चोरल्याच्या संशयावरून एका वहिफणी कामगाराचा लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केला. अलीम रशिद गदवाल (वय ३८, रा. सोडगे मळा, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अल्ताफ शेख (रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) या यंत्रमाग कारखानदारास शहापूर पोलिसांनी अटक केली.
इचलकरंजी : खोतवाडी (ता.हातकणंगले) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीसमोर सायकल चोरल्याच्या संशयावरून एका वहिफणी कामगाराचा लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केला. अलीम रशिद गदवाल (वय ३८, रा. सोडगे मळा, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अल्ताफ शेख (रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) या यंत्रमाग कारखानदारास शहापूर पोलिसांनी अटक केली.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गत आठवड्यात अल्ताफ शेख याची सायकल चोरीला गेली. त्याने परिसरात शोध घेवूनही त्याला सायकल सापडली नाही. चौकशीमध्ये अलीम गदवाल याने सायकल चोरून विकल्याची माहिती अल्ताफ याला समजली.
यामुळे त्याने अलीम याच्याकडे सोमवारी (दि.१५) रात्री विचारणा केली. त्यावेळी अलीम हा मद्यधुंद अवस्थेत होता. उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने संतप्त झालेल्या अल्ताफ याने अलीमला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अलीमचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
मंगळवारी सकाळी ४० वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांना प्राथमिक चौकशीत मृतदेह अलीम याचा असल्याचे समजले. तसेच रात्री अलीम व अल्ताफ यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळाली.
पोलिसांना सुगावा लागल्याचे समजताच अल्ताफ याने पलायन केले. पोलिसांनी त्याचा शोध घेवून त्याला अटक केली. दरम्यान, अलीम याच्या पत्नीने शहापूर पोलिस ठाण्यात अल्ताफ याच्यासह इतर साथीदारांनी सायकल चोरीच्या संशयावरून ठार मारल्याची तक्रार दिली आहे. त्यामध्ये अल्ताफ याने अलीम याची पत्नी जयदा यांना फोन करून तुझ्या पतीने सायकल चोरली असून, दोन सायकलींचे पैसे द्यावे लागतील; अन्यथा त्याला मारणार, अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे.