कोल्हापूर : कोल्हापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता महानगरपालिकेचे पुढील सभागृह ९० नगरसेवकांचे असणार आहे. येत्या निवडणुकीत ३० वॉर्डांची रचना होणार असून प्रत्येक वॉर्डातून तीन नगरसेवक महापालिकेत निवडून येणार आहेत. जर नगरसेवकांची संख्या वाढली तर सध्याचे सभागृह अपुरे पडणार हे मात्र नक्की !
महानगरपालिकेसाठी साधारणपणे सहा हजार मतदारांतून एक नगरसेवक निवडला जात आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार कोल्हापूर शहराची लोकसंख्या चार लाख ९५ हजार इतकी होती. ती आता सहा लाखांपर्यंत पोहोचलेली असावी. त्यामुळे नगरसेवकपदाच्या आणखी किमान नऊ जागांची वाढ होऊन ती ९० इतकी होईल, असे सांगितले जाते.
कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १९७८ मध्ये जेव्हा पहिले सभागृह अस्तित्वात आले तेव्हा नगरसेवकांची संख्या ५९ होती. सन १९८५ व १९९० च्या सभागृहात ६० नगरसेवक होते. १९९५ ला जेव्हा मतदारसंघांची नव्याने रचना झाली तेव्हा नगरसेवकांची संख्या ७२ वर पोहोचली होती. त्यानंतर २००५ साली ही संख्या सहाने वाढून ७८ झाली. २०१५ साली त्यात आणखी तीन नगरसेवकांची भर पडली. मावळते सभागृह ८१ नगरसेवकांचे होते.
कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आता नवीन वॉर्ड रचना होणार आहे. वाढलेल्या लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या ९० इतकी असणार आहे, तर वॉर्डांची संख्या ३० होईल. नगरसेवकांची संख्या वाढली तर मात्र सभागृहात बसण्याची मोठी अडचण होणार आहे. सध्या ८१ सदस्यांकरिता सभागृहात बसण्यास अतिरिक्त बैठक व्यवस्था केली असली तरी ती अडचणीची आहे. आता ९० वर संख्या गेली तर सभागृह नवीन बांधावे लागणार आहे. अन्यथा सर्वसाधारण सभेसाठी केशवराव भोसले नाट्यगृह घ्यावे लागेल.
- निवडणूक फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये -
महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षण तसेच त्रिसदस्यीय वॉर्ड रचनेचा निर्णय घेतल्यामुळे लवकरच नवीन बदलानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रिया सुरु होऊ शकते. प्रभाग रचना, त्यावर हरकती, आरक्षण निश्चिती, मतदार याद्या यासाठी किमान चार ते पाच महिने लागू शकतात.